मन फकिरा: मराठी कलाकारांचे हटके प्रमोशन

0
382

सध्या मराठी चित्रपट हा वेगवेगळ्या विषयांवर काम करत असून चांगल्याप्रकारे प्रगती करत आहे. मराठी चित्रपट दमदार पाऊल पुढे टाकत असून त्यात मराठी सेलिब्रिटीजही वेगवगेळ्या आयडिया प्रसिद्धीसाठी वापरत असल्याचे दिसून येतेय.
मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या विविध कलात्मक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव हे कलाकार हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळत नाही. मराठी चित्रपटांच्या कमाईचा आकडा ही हिंदीच्या तुलनेत फार कमी होतो. अशा अनेक विषयांवर चर्चा होत असतात. मात्र आता थेट चित्रपटातील अभिनेत्री आणि अभिनेते हातात फलक घेऊन प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
रविवारी १ मार्च रोजी विलेपार्ले आणि अंधेरी येथे आणि सोमवारी २ मार्च २०२० रोजी गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे ही मंडळी चक्क फलक घेऊन उभे असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. ‘आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या…’, ‘आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता’, ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार रस्त्यावर उभे होते. त्याला लोकही कलाकारांकडे कुतूहलाने पाहत त्यांना चित्रपटासाठी येण्याचं आश्वासनही देत होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकिरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आज नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे. माझ्या भूमिका असलेल्या चित्रपटांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावा आणि आमच्या वेगळ्या प्रयत्नाला त्याने पाठबळ द्यावे, म्हणून आम्ही हा हटके मार्ग अवलंबला’, असल्याचं मृण्मयी देशपांडेने म्हटलंय