महिलांनी स्वतःची ओळख जपली पाहिजे; अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

0
1399

आज आहे जागतिक महिला दिन. आज महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढे वाटचाल करत असताना मराठी मालिकांमध्ये एका अभिनेत्रीने स्वताची ओळख निर्माण केली आहे. ती अभिनेत्री म्हणजे ”स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेमध्ये महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड. महिला दिनानिमित्त सर्वांची लाडकी येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड यांच्याशी संवाद साधला.

१. पुण्यातील शाळेतील काही आठवणी ? पुण्यातील तुमचे आवडते ठिकाण?

पुणे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे ठिकाण आहे. माझी शाळा ही पुण्यातील लक्ष्मी रोड येथील हुजूरपागा मुलींची शाळा. छोटया गटापासून ते दहावीपर्यंत माझे शिक्षण तेथे झालेले आहे. सामाजिक दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या पुणे हे बेस्टच आहे आणि मला पुणेकर म्हणजेच ते म्हणतात ना आम्ही MH १२ त्याचा जास्त अभिमान आहे.
पुण्यातील आवडते ठिकाण असे काही नाही कारण संपूर्ण पुणे शहरच आवडते आहे. पण तरीही पुण्यात आले की हुजूरपागा ह्या माझ्या शाळेला जायला जास्त आवडते.

२. पुणे हे खाण्याच्या बाबतीत भरपूर समृद्ध आहे.जेव्हा मुबंईला असता तेव्हा पुण्यातील कोणकोणते पदार्थ आठवतात?

एक असे नाही तर भरपूर गोष्टी आठवतात. कारण पुण्याला खायची आणि खाणाऱयांची कमी नाही असे म्हणतात. सुजाता मस्तानी, जोशी वडेवाले तसेच मिसळ आणि कावेरीची आइस्क्रीम ह्या तर पुण्यात आल्यावर ठरलेल्या गोष्टी असतात. आणि अजुन एक महत्वाचे म्हणजे चितळेची भाकरवडी. ह्यातल्या बर्याचशा गोष्टी मी सेटवर घेऊन जात असते कारण आपला अभिमान आपणच जपला पाहिजे असे मला वाटते.

३. करिअरची सुरुवात कशाप्रकारे झाली त्याबद्दल काही आठवण?

मी हुजूरपागेत जेव्हा शाळेत होते तेव्हापासूनच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. मी जेव्हा सहावी सातवीला होते त्यावेळी लोकमान्य टिळकांचे आत्मचरित्र( (३ खंड) ते मी वाचत असे. त्यावेळेस वाचण्याची आवड निर्माण झाली. एकांकिका तसेच राज्यस्तरीय नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात झाली.
नववीला आले तेव्हा कशात भाग न घेण्याचे ठरवले होते पण त्याचवर्षी ४५ मिनिटांची हिंदी एकांकिका होती “चाणक्य की प्रतिज्ञा” त्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मी ठरवले एक आणि झाले एक असे त्यावेळी घडले. त्यानंतर मला नववीलाच हुजुरपागेचा आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कारामध्ये मला एक ढाल देण्यात आली जो हुजुरपागेमध्ये खूप मोठा मान असतो.

४. नांदा सौख्य भरे ही पहिली मालिका जेव्हा ऑफर झाली त्यावेळी मनामध्ये नक्की काय चालू होते?

त्यावेळी माझी दहावी झालेली होती. आणि कॉलेजच्या ऍडमिशनची गडबड सुरु होती. आधी फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घ्यायची ईच्छा होती. पण त्यावेळी नेमकी नांदा सौख्य भरे ह्या मालिकेसाठी निवड झाली. सुचित्राताई बांदेकर यांनी त्यावेळी ह्या रोलसाठी मीच तो रोल चांगला करू शकते असे सांगितले होते. त्यावेळी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल डिप्लोमाला मी प्रवेश घेतला आणि मालिकेचे चित्रीकरण करता करता माझे शिक्षणही मी त्यावेळी पुर्ण केले. त्यावेळी मला कॉलेज पासून ते नांदा सौख्य भरेच्या संपूर्ण टीमने खूप मदत केली.

५. ‘स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेमधील येसूबाई हे पात्र साकारताना कशा प्रकारे तयारी केली?

जेव्हा मला ह्या भूमिकेची ऑफर झाली होती त्यावेळी मी घाबरले होते. कारण मी कोणत्याही प्राण्यांना आधी हात लावलेला नव्हता आणि ह्या भूमिकेसाठी मला घोडेस्वारी तसेच तलवारबाजी करावी लागणार होती. नंतर विचार केला केला आणि हे आव्हान स्वीकारायचे ठरविले. आठ दिवसात मी तलवारबाजी शिकले आणि चित्रीकरणाच्या १५ दिवस आधी घोडेस्वारीही शिकले. झी मराठीने ही संधी दिली त्याची मी आभारी आहे. येसूबाईची भूमिका करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. येसूबाईंच्या भूमिकेने मला खूप अविस्मरणीय क्षण दिले ते मी कधीच विसरू शकत नाही.

६. मी असे ऐकलंय की साऊथ सिनेमा तुम्हाला जास्त आवडतो? बॉलिवूड का साऊथ पहिला सिनेमा कोणता करायची ईच्छा आहे?

हो मला साऊथचे सिनेमा खूप आवडतो. कधी वेळ मिळाला तर मी साऊथचे सिनेमा बघत असते. साऊथ सिनेमामध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि त्यांच्या स्टोरीज खूप अप्रतिम असतात. बॉलिवूड आणि साऊथ दोन्ही सिनेमा करायला आवडतील पण ह्या दोघांमध्ये माझे पहिले प्राधान्य साऊथच्या सिनेमाला असेल.

७. तुमचा आवडता ड्रीमरोल कोणता? तुमचे आवडते छंद काय आहेत?

ड्रीमरोल असा काही नाही आहे. पण वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतील. जसे की स्वराज्यरक्षक संभाजी मध्ये येसूबाईंची भूमिका केली तशा कणखर भूमिका करायच्या आहेत. जर वेळ असेल तर मला डान्स करायला खूप आवडतो ,वाचनही कायला आवडते आणि अजून एक म्हणजे स्विमिंग करायला खूप आवडते.

८. महिलांवर अत्याचार होतात तेव्हा आपली न्यायालयीन प्रक्रिया किंवा प्रशासन कुठेतरी कमी पडते असे वाटते का?

हो हे खरं आहे. निर्भया प्रकरणात गुन्हेगारांची फाशी दोन ते तीन वेळा पुढे ढकलली. आपण कुठेतरी कमी पडतो असे मला वाटते. न्यायालयाच्या बाबतीत मत मांडणे म्हणजे खरं तर चुकीचे आहे कारण त्या गोष्टीचा मला जास्त अभ्यास नाही आहे पण एक महिला म्हणून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होणे गरजेचे आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महराजांनी महिलेला ताठ मानेने जगायला शिकवले. पण आता ती मानसिकता दिसून येत नाही. मुलींनी आता स्वसंरक्षणावर भर दिला पाहिजे. निर्भया सारखे प्रकरण जेव्हा घडते त्यावेळी तेथेच छत्रपती शासन लागू व्हायला पाहिजे म्हणजेच गुन्हेगारांना तिथेच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असे माझे ठामपणे मत आहे.

९. महिला दिनानिमित्त तुम्ही महाराष्ट्रातील महिलांना काय संदेश द्याल?

मी संदेश देण्याइतकी मोठी तर नाहीच. पण एक महिला म्हणून मला नेहमी वाटते प्रत्येक महिलेने स्वतःची ओळख जपली पाहिजे. परमेश्वराने आपल्याला खूप चांगले जीवन दिलेले आहे तर त्याचा उपयोग चांगल्याप्रकारे करून स्वतःची आवडनिवड जपली पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने ,मुलीने स्वसंरक्षण शिकले पाहिजे. येसूबाईंनी जसं स्वराज्यासाठी त्याग केला तसाच त्याग प्रत्येक महिला करू शकते आणि खूप पुढे जाऊ शकते.
सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेदरम्यान घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेताना