कोकणामध्ये अशी साजरी करतात होळी

0
888

भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता छोटा-मोठा सण, उत्सव साजरा होतच असतो.भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला खूप महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. होळी उत्सवाला ‘होलिकादहन’, ‘होळी’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात याला ‘शिमगो’ म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त ‘वसंतोत्सव’ असेही याला म्हटले जाते.
कोकणात हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवानंतर शिमगोत्सवाची विशेष उत्सुकता असते. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते.
फाल्गुन शुक्ल पंचमी ते हुताशनी पौर्णिमा या दिवसामध्ये कोकणातील लहान मोठ्या गावांमध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी काढण्याची प्रथा असते. या पालखीमध्ये ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा ठेवल्या जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी निघते. गावातील प्रत्येक वाडीमध्ये, घरासमोरून नाचवली जाते
शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात.ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.