मराठी चित्रपटसृष्टी: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

0
713

मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी आज पहाटे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. जयराम कुलकर्णी यांच्या मागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. अभिनेत्री मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून आहेत. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी हा त्यांचा नातू आहे.

मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘नवरा बायको’, ‘माल मसाला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ इत्यादी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका विशेष ठसा उमटवणारी ठरली.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी त्यांचा जन्म झाला. या गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड असल्यामुळे इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती. आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या बरोबरच ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला.