प्रशांत दामलेंची माणूसकी: पडद्यामागील कलावंतांना दिला आर्थिक मदतीचा हात

0
370

कोरोना व्हायरसने राज्याला वेढीस धरले आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या धर्तीवर राज्य सरकारने मॉल्स आणि थिएटर बंद केले आहेत. या करोना बंदचा फटका चित्रपट व्यवसायापेक्षा नाट्यक्षेत्राला बसला आहे.कोरोनामुळे नाट्यनिर्मात्यांचं आणि पर्यायाने संपूर्ण नाट्यसृष्टीचं झालं आहे.कोरोना विषाणूमुळे झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. नाटकांचे सर्व प्रयोग सध्या रद्द करण्यात आल्यानं नाट्यव्यवसाय पूर्ण पणे ठप्प आहे. याची झळ हातावर पोट असणाऱ्या पडद्यामागच्या कामगारांना बसताना दिसत आहे. या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचा आर्थिक नियोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असं असलं तरी अभिनेते प्रशांत दामले यांनी या कामगारांचा विचार करून त्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे.

प्रशांत दामले यांनी पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात म्हणून प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली आहे. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल याची अजून खात्री नाही. पण तोपर्यंत कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी प्रशांत दामलेंनी केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे. प्रशांत दामलेंनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाच सगळ्याच स्तरावरून स्वागत होत आहे. कलाकार म्हणून आपल्यासोबतच्या सर्वांना समजून घेत प्रशांत दामलेंनी हे पाऊल उचललं आहे.

अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. प्रशांत दामले… मानलं तुम्हाला! करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाट्यगृह बंद केली असतना, हातावर पोट असणाऱ्या आपल्या नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रशांत दामले यांनी प्रत्येकी १०,००० रुपये दिले. अशी दानत दाखवणाऱ्या एका आदर्श आणि काळजीवाहू निर्मात्याला मनापासून सलाम असं म्हणत पुष्करनं दामलेंचं कौतुक केलं आहे