जनता कर्फ्यू: देशवासीयांनी एकत्र येऊन टाळ्या आणि थाळी वाजवत मानले आभार

0
430

(डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीसांचे जनतेने मानले आभार)

देशावर ओढवलेल्या करोना साथीच्या संकटातही अहोरात्र सेवा देत असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांना आज अवघ्या देशाने सलाम केला. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या तसेच बच्चे कंपनीनं थाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. धडाकेबाज कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ दिले. अवघ्या देशात एकाचवेळी घंटा आणि थाळीनाद घुमला.

अतिशय नि:स्वार्थ अशा वृत्तीने कोरोना व्हायरसचं संकट ओढावलेलं असतानाही रुग्णांच्या सेवेत तत्पर असणाऱ्य़ा, प्रशासनाच्या सेवेत तत्पर असणाऱ्या आणि या संकटसमयी इतरांना कोणत्याही प्रकारे मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्यासाठी आज सर्व भारतीयांनी एकत्र येऊन आभार व्यक्त केले. आजचे हे दृश्य बघण्यासारखे होते. सर्व भारतीयांनी एकत्र येऊन चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासून पूर्णपणे शांत असलेले पुणे शहर आणि ग्रामीण भाग थाळी व टाळ्यांच्या निनिदाने दुमदुमले.

आज सकाळपासून रात्री ९ वाजेपर्यंत मोदींनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींनीही कोरोनाशी लढा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कर्फ्यूच्या दरम्यान लोकांनी गॅलरीमध्ये येत एकीचे बळ दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले.

आपण जर एकत्र आलो तर काय करू शकतो हे सर्व जगाला आपण दाखवून दिले आहे. अशीच एकजूट आपण कायम राखली आणि सरकारच्या सुचनांचे पालन योग्यरित्या केले तर आपण कोरोनाला लवकरच गुड बाय करू तसेच आपला देश लवकरच कोरोनामुक्त होऊन जाईल यात काडीमात्र शंका नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण कुटुंबासह टाळ्या वाजवून या मोहिमेत भाग घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील टाळ्या वाजवून या मोहिमेत भाग घेतला. मुंबईत महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत बंगल्याच्या गच्चीवर जाऊन टाळ्या वाजवून आणि घंट्या वाजवून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.