शहरातील वाहतूकीला दुपारनंतर रस्त्यावर बंदी

0
450

संचारबंदी असतानाही घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना पोलिसांनी इशारा दिला आहे. शहरातील वाहतूक दुपारनंतर पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. तरीही अनेक नागरिक सोमवारी सकाळपासून रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोमवारी दुपारनंतर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश कायम राहिल. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूकच सुरू ठेवण्यात येईल.

वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन व्यवस्था, पोलीस, अग्निशमन, कर्तव्यावर असलेले सरकारी-निमसरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ यांच्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येतील. नागरी भागात संचारबंदी सुरु असतानाही अनेक वाहने रस्त्यावर आली आहेत. संचारबंदीचा आदेश लोकांनी मनावर न घेतल्यामुळे दुपारपासून वाहनबंदी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळपासून वाहतूक थांबवण्यात येणार होती.

सोमवारी सकाळपासून पुणे पोलिसांकडून विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनचालकांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र असले आणि ते अत्यावश्यक सेवेशी संबंधित असले तरच त्यांना सोडण्यात येत आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही लोकांनी खासगी वाहनं काढून प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जमावबंदीचे तीनतेरा वाजले आहेत. या गर्दीला अटोक्यात आणण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.