कोरोनामुळे टोकिओ ऑलंपिक स्पर्धा स्थगित

0
366

चीनमधून अन्य देशात पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus)सध्या जगभर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये उलथापालथ सुरू असून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. याच कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक क्रीडास्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा, टोकीओ ऑलिम्पिक आता ही स्पर्धा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ही स्पर्धा थेट पुढील वर्षी अर्थात २०२१ला होणार आहे. वर्षाच्या मध्यभागी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

जापान आणि आयओसी मागील अनेक दिवसांपासून म्हणत होते की, टुर्नामेंट आपल्या ठरलेल्या तारखेलाच होईल. पण, आता कोव्हिड-19 च्या वाढत्या धोक्यामुळे जापान आणि आयओसीवर ही टुर्नामेंट स्थगित करण्याचा दबाव वाढत होता आणि अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित होती. कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. पण स्पर्धा नियोजित वेळीच होणार असा पवित्रा जपानचे सरकार आणि ऑलिम्पिक समिती यांच्याकडून घेण्यात आला. त्यानंतर आधी कॅनडा, नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे या तिहेरी दणक्यानंतर जपानचे सरकारने ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

जपानचे पंतप्रधान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बाक यांच्यात चर्चा झाल्यानंतर टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात एकमत झाले आहे. ही स्पर्धा २०२१च्या उन्हाळ्याच्या आधी घेतली जाईल. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू आणि अन्य सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे IOC आणि टोकिओ ऑलिम्पिक समितीने एकत्र प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक पाण्यात जाणार आहे. त्यामुळे हे प्रचंड मोठं आर्थिक संकटही ठरू शकेल. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने मोठं आर्थिक नुकसान जपानला सोसावं लागणार आहे.