आनंदाची बातमी; ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकाही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

0
484

सध्या लॉकडाउनमुळे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे. शुटिंग बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकारही घरीच आहेत. यातच काही जुन्हा प्रसिद्ध मालिका या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुन्हा पाहायला मिळत आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे सर्व मालिकांच्या शूटींग देखील रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता जुन्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर आता प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयीची आवड आणि पसंती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘दर्या, नभामधून, सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला…. ‘ हा आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे. येत्या ३० मार्च पासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दुपारी ४ वाजता मालिका प्रसारित होईल. ४ ते ८ या वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. शिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या निमित्ताने पुन्हा एकदा घरात बसलेल्या मंडळींना कुटुंबासोबत एकत्र बसून पाहण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.

दूरदर्शनवर शनिवारपासून “रामायण”, “महाभारत”, “व्योमकेश बक्षी” आणि “सर्कस” या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता झी मराठीनेही आपली लोकप्रिय मालिका “स्वराज्यरक्षक संभाजी” पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.