कोरोनाला आळा घालण्यासाठी पुण्यातील ४ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मैदानात

0
300

(अजित पवारांचा निर्णय)

पुण्यातील कोरोना विषाणू प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारवाई अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री.अनिल कवडे, श्री,सौरभ राव, श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करणार आहेत.

राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. सचिंद्र प्रतापसिंह यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त पदाची तर, कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. विशेषतः भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली आहे.