अजून एक बॉलीवूडचा तारा हरपला; अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

0
309

(कॅन्सरशी झुंज अपयशी)

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कॅन्सरशी दोन वर्षे त्यांनी दिलेला लढा अपयशी ठरला मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री उशीरा प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

कपूर कुटुंबियांकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात गुरुवारी सकाळी ८.४५ मिनिटांनी ऋषी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमिया आजाराशी लढत होते. गेल्या वर्षी भारतात परतल्यानंतर ते फार आनंदी होते आणि त्यांना प्रत्येकाला भेटायची इच्छा होती. पण हा आजार त्याच्यापासून दूर गेला नाही.

चिंटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईच्या चेंबूर येथे झाला होते. ते राज कपूर यांचा दुसरा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचे नातू होते. त्यांनी आपल्या भावांबरोबर मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि अजमेरमधील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. रणधीर कपूर हा त्यांचा मोठा भाऊ आणि राजीव कपूर हा त्यांचा धाकटा भाऊ आहे. ऋषी आणि नीतू यांना रणबीर कपूर हा मुलगा आणि रिदिमा कपूर ही मुलगी आहे.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या बातमीतून लोक सावरलेही नव्हते की अभिनेते ऋषी कपूर यांनी या जगातून एक्झिट घेतली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवर याविषयी माहिती देताना ट्विट केले आहे, ‘तो गेलाय… ऋषी कपूर गेलाय… मी उद्धवस्त झालोय!’

त्यांच्या निधनावर चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५०हून जास्त भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये त्यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या श्री ४२० या चित्रपटात त्यांनी प्यार हुआ इकरार हुआ या अजरामर गाण्यामध्ये एक छोटीशी भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर १९७० साली आलेल्या मेरा नाम जोकर सिनेमामध्ये त्यांनी राजूच्या तरूणपणीची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांना सर्वोत्तम बालकलाकाराचा नॅशनल फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र, त्यांची प्रमुख भूमिकांची इनिंग सुरू झाली ती १९७३ साली प्रदर्शित झालेल्या बॉबी या सिनेमामधून. या सिनेमासाठी देखील त्यांना सर्वोत्तम अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अशा प्रकारे कारकिर्दीतल्या पहिल्या ३ सिनेमांमध्ये त्यांनी वडील राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली काम केल्यानंतर त्यांनी पुढे अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं.

मोठ्या पडद्यावर १९७० ते १९९० हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. ‘अमर अकबर अँथोनी’, ‘कुली’, ‘कर्ज’ या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. ‘हम तुम’, ‘अग्निपथ’, ‘कपूर अँण्ड सन्स’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

ऋषी कपूर यांची सिनेकारकीर्द

  • बॉलिवूडचे चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी झाला होता.
  • त्यांची सिनेकारकीर्द जवळपास 50 वर्षांची होती.
  • मेरा नाम जोकर चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांनी पदार्पण केलं होतं. तर मुख्य भूमिका असलेला बॉबी हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
  • लैला मजनू, रफुचक्कर, सरगम, कर्ज, प्रेमरोग,नगिना,चांदणी, हिना, बोल राधा बोल,सागर, दामिनी, दिवाना यांसारख्या सुपरहिट सिनेमांसह 93 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली.
  • पत्नी नीतू सिंह यांच्यासोबत लग्न होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 12 चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
  • 2008 मध्ये ऋषी कपूर यांना फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.