कुटुंब… म्हणाल तर एक शब्द, मात्र विचार केला तर एखाद्यासाठी त्याचे संपूर्ण विश्व. जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरुद्ध उभे असते, तव्हा फक्त कुटुंबच आपल्यामागे ठाम उभे असते. आज जागतिक कुटुंब दिन. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. शांतता, विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा, म्हणून संयुक्त राष्ट्रांनी ‘जागतिक कुटुंब’ दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. वास्तविक पाहता १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. खरे म्हणजे भारतासारख्या देशात कुटुंब दिन वगैरे रोजच साजरे होत असतात. भारतातील कुटुंब पद्धती, प्राचीन परंपरा, चालिरिती यांमुळे कुटुंबवत्सल देशात मुद्दाम कुटुंब दिन साजरा करावा लागत नाही.
सध्याची व्यस्त जीवनशैली लक्षात घेता प्रत्यक्षातल्या भेटीपेक्षा समाजमाध्यमांतली भेट पुष्कळच सोयीची झाली आहे. त्यामुळे ‘व्हॉट्स अॅप’, ‘फेसबुक’, ‘हाइक’ इत्यादी माध्यमांवर किती तरी फॅमिली ग्रुप्स तयार झाले आहेत. पण कोरोना संक्रमणामुळे आता खरे कुटूंब एकत्र आली आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जागतिक कुटुंब दिन साजरा होत असल्याने त्याला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. आता सर्व जण गेल्या कित्येक महिन्यापासून घरात असल्याने कुटूंबाला वेळ मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर घरामध्ये निरनिराळे खेळ आणि स्वयंपाक घरात एकत्र येऊन नवीन नवीन पदार्थ तयार करत असल्याचे दिसून आलेय. कुटूंबीयांसोबत एकत्र राहून ह्या सर्व गोष्टी करायला मिळणे यापेक्षा दुसरा आनंद कशातच नाही.
करोनाचे संकट गहिरे होत असताना लॉकडाऊनच्या काळात गेले दोन महिने रोजच कुटुंब दिन साजरे झाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी आहे. लॉकाडाऊन सुरू झाल्यापासून फॅमिली ग्रुपवर तर मेसेजेसची संख्या अनेकपटीने वाढलेली सर्वांनीच अनुभवली. कुटुंब संवाद, नात्यात आलेला दुरावा कमी करणे, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, आठवणींचे संच, खंड एकमेकांसाठी रिते करणे, नातेसंबंध दृढ करणे अशा कितीतरी गोष्टी लॉकडाऊनच्या काळात सुरू झाल्या. मुलांना वेळ देणे, आई-वडिलांना वेळ देणे, एकमेकांना वेळ देणे हे लॉकडाऊनमुळे शक्य झाले
मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर, ही भारतीय संस्कृती आहे. मात्र, परकीयांचे अंधानुकरण, सोशल मीडियाचा वाढता प्रचार, प्रसार, ट्रेंड यांमुळे भारतीय कुटुंब व्यवस्थेला वेगळीच दिशा मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळते. व्हॉट्स अॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरून नाईलाजाने किंवा अन्य काही कारणांमुळे विभक्त झालेली कुटुंबे पुन्हा एकदा आभासी जगाच्या माध्यामातून एकत्र आली आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर कौटुंबिक मैफिली रंगू लागल्या.