सोनू सूदच्या कामाला मनापासून सलाम

0
355

लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येतील मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशा अवस्थेत या मजूरांनी शेकडो किमीची पायपीट करत आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला आहे. सरकार या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे प्रयत्न करतेय. पण आताश: या गरिब, अगतिक मजुरांचा धीर सुटत चाललाय. कसेही करून लवकरात लवकर त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या मजुरांच्या मदतीसाठी धावला आहे. होय, बस सेवा सुरू करून सोनू आपल्या घरापासून, आप्तांपासून दूर अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद चर्चेत आहे. या चर्चा त्याने लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन उत्तर भारतातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सोनू सूदचा आणखी एक किस्सा आता चर्चेत आला आहे. उत्तर भारतीय मजुरांना घरी पाठवताना त्यांनं चौकशी करत पुन्हा परत येणार का? असा प्रश्नही विचारला.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी सोनू सूद मजुरांना बसमध्ये बसवण्यासाठी बस स्थानकाजवळ गेला होता. त्यावेळी सोनू सूदने बसमधील मजुरांशी संवाद साधला. सुरूवातीला त्याने मजुरांची चौकशी केली. नंतर त्या बसमध्ये बसलेल्या सर्वांना मास्क लावण्यास सांगितलं. तसेच बसमध्ये पिण्याचे पाणी आणि खाण्याची सोय केली असल्याचे सांगत निरोप दिला. यावेळी त्याने सर्व काही ठिक झाल्यानंतर पुन्हा येणार ना? असा प्रश्नही विचारला.

सोनूने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ट्विटरवर त्याचा फोन नंबर शेअर केला. दिलेल्या नंबरवर त्याने मजुरांना त्यांना कुठे जायचे आहे, ते कुठे अडकले आहेत, एकूण किती लोक आहेत ही सर्व माहिती देण्यास सांगितली होती. पडद्यावरील खलनायक आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात अनेकांसाठी सुपरहिरो ठरला असल्याचे म्हटले जाते. तो करत असलेल्या कामाची सर्वजण प्रशंसा करत आहेत.

आधी सोनूने डॉक्टरांना आराम करण्यासाठी स्वत:चे हॉटेल खुले केले होते. तसेच त्याने पीपीई किट्सची देखील मदत केली आहे.