अक्षय कुमारचा “लक्ष्मी बॉम्ब” प्रदर्शनापुर्वीच मालामाल

0
429

देशावर असलेल्या करोनाचं संकट टळावं यासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात कलाविश्वासोबतच साऱ्या क्षेत्रातील कामकाज ठप्प आहे. फिल्मसिटीदेखील बंद असल्यामुळे अनेक चित्रपटाचं चित्रीकरण, प्रमोशन सारं काही बंद आहे. तसंच चित्रपटगृहदेखील बंद असल्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. त्यामुळेच अनेक दिग्दर्शक,निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट चित्रपटगृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लवकरच अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे हक्क १२५ कोटी रुपयांना विकल्याचं सांगण्यात येत आहे.त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच मालामाल झाल्याचं म्हटलं जात आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. याच कारणास्तव चित्रपटाच्या टीमने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं काही काम बाकी असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख करण्यात आलेली नाही. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.