जागतिक पर्यावरण दिन: घरात राहून करा साजरा

0
993

जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जूनला साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश्य आहे. मनुष्य आणि पर्यावरणाचे अतूट नाते आहे. मनुष्य जीवन निसर्गाशिवाय शक्य नाही. पण सध्याच्या घडीला माणूसच आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचे नुकसान करत आहे. अनेक ठिकाणी सर्रास वृक्षतोड होत आहे, समुद्र-नद्या प्रदूषित होत आहेत. जागतिक पर्यावरण दिवस 1972 पासून साजरा करण्यात येत आहे. 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्राने जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची दरवर्षी थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे हा दिवस यावेळी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. कारखाने, वाहनांची वाहतूक यासह सगळ्याच गोष्टी लॉकडाऊनमुळे बंद असल्याने प्रदूषण आपोआपच काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिवस मागील वर्षांपेक्षा वेगळा असेल. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 2020 ची थीम ‘वेळ आणि निसर्ग’ अशी आहे.

सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पर्यावरण समस्यांकडे अधिक जागरुकपणे पाहणे आणि या चळवळीत सर्वांना सामील करून घेऊन आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे या हेतूने हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. पर्यावरणाचे रक्षण करणे ही एक सवयच झाली पाहिजे. यासाठी समाज प्रबोधन सातत्याने केले जाण्याची जरूरी आहे.समाज प्रबोधन केले की काही उद्दीष्टे साध्य होतात, याची दोन उदाहरणे सहजपणे सांगता येतील.दिवाळीसारख्या प्रकाशाच्या उत्सवात फटाके लावले तर ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण कसे होते, हे जेव्हा शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले तेव्हा मागील चार वर्षांपासून फटाक्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून आले. एक वर्षी पाण्याचा मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी ‘सुकी होळी खेळा’ हा संदेश लोकांना दिला गेला तेव्हा लोकांनी तसे करून दाखविले.

घरात राहून पर्यावरण दिवस असा करा साजरा

  • शक्य असल्यास यंदा आपल्या घरातच छोटी रोपं लावा.
  • वस्तूंचा फेरवापर करण्याबाबत विचार करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही यात सहभागी करा
  • पॉलिथिनचा वापर शक्यतो करु नका, त्याऐवजी कापडी पिशव्या वापरा.
  • विजेचा कमीत कमी वापर करा.
  • घरातील कोणतीही वस्तू फेकण्याआधी तिचा आणखी कोणत्या प्रकारे वापर होईल का हे पाहा.
  • रस्त्यावर किंवा इतरत्र थुंकू नका आणि इतरांनाही याबाबत सांगा.
  • नव्या पिढीला निसर्ग, पर्यावरण, पाणी तसंच वृक्षांचं महत्त्व समजावून सांगा.

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.