- 8 जूनपासून रेस्तराँ-धर्मस्थळ-मॉल-हॉटेल उघडण्यासाठी केंद्राची परवानगी
- महाराष्ट्रात धार्मिक स्थळे आणि मॉलला अजूनही परवानगी नाही
अडीच महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केली. या घोषणेनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानुसार येत्या ८ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून देशभरात कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यासाठी पाळावयाच्या नियमांची यादीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने जारी केली आहे. या नियमांनुसारच ही ठिकाणं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जरी मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्र सरकारने मात्र धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंदच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जेव्हा राज्य सरकार मंदिरं उघडण्याचा निर्णय घेईल, तेव्हा मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीचं पालन करावं लागेल
धार्मिक स्थळी प्रसाद वाटप व घंटी वाजण्यास मनाई असेल. मॉल्समध्ये मुलांच्या खेळण्याची जागा बंद ठेवावी लागेल. हॉटेल्समध्ये फक्त डिजिटल पेमेंट करण्यास सांगितले आहे.
अनलॉक १. ० नियमावली:
धार्मिक स्थळांसाठी नियमावली
- चपला, शूज गाडीतच ठेवावे किंवा धार्मिक स्थळापासून दूर ठेवावेत.
- मंदिर, मशिद, चर्च, गुरूद्वारामध्ये जाताना हात पाय धुवून जावे
- रांगेत राहताना अंतर ठेवून उभे रहावे. तसेच ठराविक अंतरावर चिन्ह करून उभे रहावे.
- मूर्ती किंवा पवित्र गाथा, कुरान, बायबलला स्पर्श करता येणार नाही.
- धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
- प्रसाद किंवा जल हातानं देता येणार नाही.
- सामुदायिक अन्नदान, लंगरचे जेवण बनवताना आणि वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे.
- प्रवेश द्वार आणि बाहेर पडण्याचे द्वार वेगवेगळे असावे.,
मॉलसाठी नियमावली
- एसी 24 ते 30 दरम्यान असावा तर ड्युमिडीटी 40 ते 70 ठेवावी.
- पार्किंग आणि मॉल परिसरात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे बंधनकारक
- प्रवेश द्वारावर सॅनिटाइजर आणि थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक.
- कोरोना लक्षण नसणा-यांनाच प्रवेश दिला जाईल.
- होम डिलिवरी देणा-यांची थर्मल स्क्रिनिंगची जबाबदारी मॉल प्रशासनाची असेल.
- एलीवेटर वरून जाताना एक पायरी सोडून उभे रहावे.
- गेमिंग सेक्शन, लहान मुलांना खेळण्याचे ठिकाण आणि चित्रपटगृह बंद असतील.
- फूड रेस्टॉरेंटमध्ये बसणा-यांची क्षमता 50 टक्के पेक्षा जास्त नसावी.
कार्यालयासाठी नियमावली - कंटोन्मेंट झोन मध्ये राहणा-यांना कार्यालयात जाता येणार नाही. घरून काम करू शकता, कार्यालयीन उपस्थिती ग्राह्य धरली जाईल.
- विजिटर पास स्थगित केला जाईल. जर महत्त्वाचे असेल तर स्क्रिनिंग करून आणि ज्यांना भेटायचे आहे त्यांच्या परवानगीनं प्रवेश दिला जाऊ शकतो.
- व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींग घ्यावी.
रेस्टॉरंटसाठी नियमावली
- टेक अवेला प्रोत्साहन द्यावे.
- डिलिवरी देणा-या व्यक्तीने जेवणाचे पाकिट हातात देऊ नये, ते दरवाजावर ठेवावे.
- हाॅटेलमध्ये आसन व्यवस्था 50 टक्केच असावी. मेन्यू एका वेळा पेक्षा जास्त केला जाऊ नये.
- बुके व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- ग्राहक गेल्यानंतर सीट सॅनिटाईज करावे
हॉटेलसाठी नियमावली
- यादीत ग्राहकाची मागील ट्रॅवल हिस्ट्रीचे विवरण द्यावे. ग्राहकाची वैद्यकीय माहिती असावी.
- ओळखपत्र असावे आणि डिक्लरेशन फाॅर्म भरून दिल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.
- कोणत्याही गोष्टीसाठी संपर्क येऊ नये यासाठी क्यूआर कोड, आॅनलाईन फाॅर्म आणि डिजिटल पेमेंट स्वीकारावे लागेल.
- रूममध्ये सामान पाठविण्यापूर्वी किटाणूरहित करावे लागेल.
- रूम सर्विस आणि टेक अवे ला प्रोत्साहन द्यावे.