जागतिक आरोग्य संघटना( WHO) नक्की कशाप्रकारे काम करते?

0
494
FILE PHOTO: A logo is pictured outside a building of the World Health Organization (WHO) during an executive board meeting on update on the coronavirus outbreak, in Geneva, Switzerland, February 6, 2020. REUTERS/Denis Balibouse/File Photo

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या आजारास जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर केल्यावरच जगभरातील राज्यकर्त्यांनी त्याकडे अधिक गांभीर्यानं पाहण्यास सुरुवात केल्याचं दिसलं. जागतिक आरोग्य संघटना आपल्याला वेळोवेळी माहिती आणि सल्ले देण्याचे काम करत असते हे आपण पाहत असतो. आज आपण जागतिक आरोग्य संघटना नक्की काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत.

जागतिक आरोग्य संघटना : (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO) ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून ती राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचा व पॅरिस येथील ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालया’चा (Office Internationale d’hygiene Publique) वारसा पुढे चालवीत आहे. ‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे. असे प्रयत्न करणाऱ्या संस्था पूर्वीही होत्या.

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या संघटनेमध्ये 192 देशांचा सहभाग आहे. दक्षिणी अमेरिकेत ब्राजील, युरोपात कोपनहेगन डेन्मार्क, दक्षिण पूर्व एशियात दिल्ली, अमेरिकेत वाशिंग्टन, आशियात इजिप्त आणि पश्चिमेस फिलिपिन्स अश्या सहा जागीस ह्याचे कार्यालय आहे.

लोकांच्या आरोग्यविषयक समस्येचे निरासन करणे ह्या संघटनेचा मुख्य हेतू आहे. ह्या मध्ये मानसिक, शारीरिक अवस्था समजून आरोग्याचा विचार करणे समाहित आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, त्यांना आरोग्यविषयक वैधकीय मदत पुरवणे आदी कामे केली जातात.

WHOच्या प्रयत्नांमुळे देवी रोगाचं उच्चाटन, पोलियो सारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झालं. इबोलावरची लस तयार करण्यातही WHOनं महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या HIV-एड्स, इबोला, मलेरिया, टीबी अशा संसर्गजन्य आजारांबरोबरच, कॅन्सर आणि हृदयविकार तसंच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती अशा क्षेत्रांतही WHO काम करते आहे. विविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचं काम चालतं. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे

जागतिक आरोग्य संघटनेचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

(१) जागतिक आरोग्यसभा (संसदेच्या स्वरूपाची) : ही सभा वर्षातून एकदा भरते. सभेला प्रत्येक सभासद राष्ट्राने तीन प्रतिनिधी पाठवावयाचे असतात. या सभेत संघटनेचे सर्वसाधारण धोरण व अर्थसंकल्प ठरविणे, ही कामे होतात.

(२) कार्यकारी मंडळ (मंत्रिमंडळाच्या स्वरूपाचे) : हे मंडळ ठरलेल्या धोरणांची अंमलबजावणी करते व अर्थसंकल्प तयार करते. या मंडळात २४ देशांचे प्रतिनिधी असून त्यांतील ८ आळीपाळीने दरसाल निवृत्त होतात, परंतु ते फेरनिवडणुकीस पात्र असतात.

(३) सचिवालय (प्रत्यक्ष कार्य करणारे कर्मचारी) : हे सचिवालय एका प्रमुख संचालकाच्या हाताखाली असून त्याच्या मदतीकरिता इतर कर्मचारी नेमलेले असतात. हे कर्मचारी व प्रमुख कोणत्याही देशातून घेतले जातात. निवड झाल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा प्राप्त होतो. जानेवारी १९७३ मध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या (प्रादेशिक कार्यालयांतील व प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मिळून) सु. ३,५०० होती.

कार्य आणि उद्दिष्टे:

संघटनेच्या घटनेतील पहिले कलम ‘जगातील सर्व लोकांना शक्य तेवढे अधिकाधिक आरोग्य मिळवून देणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे’ असे असून या उद्दिष्टानुसार संघटनेचे कार्य चालते.

संघटनेमार्फत होणारे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अनेक राष्ट्रांना अनेकविध प्रकारे साहाय्य करणे. हे साहाय्य पुढील स्वरूपाचे असते : (१) राष्ट्रीय आरोग्य सेवेला मजबुती आणण्यासाठी मदत. (२) आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी शिक्षण साहाय्य. (३) राष्ट्रातील प्रमुख रोगांच्या निवारणार्थ मदत. (४) माता व बालके यांच्या आरोग्यरक्षणाकरिता साहाय्य. (५) पाणीपुरवठा आणि इतर स्वच्छताविषयक कार्यांसाठी साहाय्य. (६) मानसिक आरोग्य प्रवर्तक साहाय्य.

एखाद्या राष्ट्राकडून साहाय्याकरिता मागणी येताच संघटनेमार्फत त्या विशिष्ट प्रश्नाचा अभ्यास केला जातो. तेथील शासनाच्या एकट्या प्रयत्नाने तो सुटणार नाही, अशी खात्री करून घेतल्यानंतर त्या राष्ट्रातील आरोग्याधिकाऱ्याबरोबर विचारविनिमय करून एक आराखडा तयार करण्यात येतो. हा आराखडा संबंधित प्रादेशिक केंद्रामार्फत मध्यवर्ती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. सभेने मान्यता दिल्यानंतर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीकरिता तपशीलवार योजना तयार करण्यात येते नंतर जरुरीनुसार मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रादेशिक कार्यालयाला तज्ञ पुरविण्यात येतात व मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनांनुसार प्रत्यक्ष कार्यास सुरुवात होते. या कार्यात संघटना कर्मचारी आणि स्थानिक आरोग्याधिकारी सहभागी असतात. हाती घेतलेले कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी त्या राष्ट्राच्या शासनावर असते.

भारताला आतापर्यंत हिवताप, क्षय, देवीनिर्मूलन, माता व बालके यांचे आरोग्य या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता तसेच कुष्ठरोग, गुप्तरोग, खुपरी, पटकी इत्यादींवरील मोहिमांकरिता पुष्कळ साहाय्य मिळाले आहे. नागपूर येथील केंद्रीय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संशोधन संस्थेला उपकरणे व इतर साहित्य घेण्याकरिता सव्वापाच लक्ष डॉलर्स मिळाले असून संघटनेने योग्य तो सल्लाही या कामी दिला.