लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ: पंतप्रधान मोदी

0
628

संपूर्ण जग कोविड -१९ शी लढत असून भारतही त्यामागे मागे नाही. परंतु या संकटाला आता संधीमध्ये रुपांतरित करण्याची हीच संधी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ज्या क्षेत्रात आपण मागास आहोत त्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याची ही संधी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. ते द इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या ९५ व्या वार्षिक सत्रात बोलत होते.

“आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. करोना व्हायरसच्या संकटादरम्या त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बंगाली भाषेतून केली. “गेले ९५ वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीनं ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्यानं पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असं म्हटलं जात,” असंही त्यांनी नमूद केलं.

आपण सगळे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहोत. आपण कोणत्या संकटाचा कसा सामना करतो, यावर आपल्याला भविष्यात येणाऱ्या संधी ठरतात. आपली इच्छाशक्तीच आपला पुढचा मार्ग ठरवणार आहे. जो आधीच हार मानतो, त्याच्यासमोर नव्या संधी येत नाहीत. पण जे जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, त्यांच्यासमोर नव्या संधी जास्त येतात.

मित्रांनो, ही आपली संकल्पशक्ती, आपली इच्छाशक्ती आपली खूप मोठी शक्ती आहे. संकटावरचं एकच औषध असतं, ते म्हणजे मजबुती. संकटाच्या वेळी भारताचं सामर्थ्य अधिक वाढलं आहे. देशवासियांना ऊर्जा दिली आहे.

कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आलंय. कोरोना योद्ध्यांसोबत आपला देश या लढाईत जराही मागे नाही. पण या सगळ्यात प्रत्येक देशवासीयाने आता हा संकल्प केला आहे की या संकटाला संधीमध्ये परावर्तीत करायचं आहे. याला आपल्याला देशाचा खूप मोठा टर्निंग पॉइंट बनवायचा आहे. हा टर्निंग पॉइंट म्हणजे आत्मनिर्भर भारत.

आपण पाहातो, की कुटुंबात देखील मुलं १८-२० वर्षांची होतात, तेव्हा आई-वडील त्याला किंवा तिला सांगतात की आपल्या पायावर उभं राहायला हवं. त्यामुळे आत्मनिर्भर व्हायचा पहिला धडा आपल्या कुटुंबापासूनच सुरू होतो. भारताला देखील आत्मनिर्भर व्हावं लागेल. याचा अर्थ भारत दुसऱ्या देशांवर आपलं अवलंबित्व कमीत कमी करेल. ज्या गोष्टी आपण आयात करतो, त्या गोष्टी भारतात कशा बनतील यासाठी आपल्याला वेगाने काम करायचं आहे.

आपल्या लोकलसाठी व्होकल व्हायची आता वेळ आली आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य, आख्खा देश आत्मनिर्भर करण्याची गरज आहे.