शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

0
281
  • ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने देखील होणार सुरुवात
  • कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार

राज्यातील शाळा कधी सुरू होणार याबाबत संभ्रम असताना शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत तयार केलेल्या आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओकॉन्स्फरिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लवकरच त्यासाठीची घोषणा केली जाणार आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करता येऊ शकतात. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास मंजूरी दिली आहे.

मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुभाव आहे त्या ठिकाणी मात्र परिस्थिती पाहून निर्णयात बदल केला जाईल. मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय घेतला जाईल.

सुरू करण्याचे नियोजन

रेड झोन मध्ये नसलेल्या 9,10,12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्ट पासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षण विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार पुढील मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत.

  • राज्यात जुलै पासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार.
  • सरसकट शाळा सुरू होणार नाही.
  • जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याची तयारी.
  • सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी.
  • पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी.
  • अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी.
  • विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक.
  • प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट.
  • शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक.

 हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.