यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार

0
317

करोनाचे संकट असल्याने शासन निर्णय आणि लोकांचे हित ध्यानात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू, असे प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सांगितले. टाळेबंदीचे निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतर सर्व गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून उत्सवाची अंतिम रूपरेषा ठरविली जाईल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.

पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांसोबत मुख्यमंत्र्यांची आॅनलाईन बैठक झाली. राज्यातील गणेश मंडळांसोबत मुख्यमंत्र्यांनी प्रथमच एकत्रित आॅनलाईन संवाद साधला. यावेळी दीर्घ चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होणार की नाही, या संभ्रमात सगळेच आहेत. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीमध्ये पुण्यातील मानाच्या तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन दिले.

गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यंदा मिरवणुका न काढता मंडळांनी दहा दिवस आरोग्यदृष्टय़ा काम करायला हवे. वारीला परवानगी देता आली नाही. त्याप्रमाणे गणेशोत्सवात मिरवणुकांना परवानगी देणे यंदा शक्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यंदाचा उत्सव वाजतगाजत शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने म्हणजे नेमका कसा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे आपण ठरवायला हवीत. त्यावर चर्चा करून पुन्हा होणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करू, असे त्यांनी सांगितले.

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिकविधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे .अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

आरोग्याची काळजी घ्यावी -उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, पुण्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचे सर्वांनी अनुकरण करावे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीने देखील शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

कोरोनाची समस्या जागतिक असून पुढील काळ कदाचित अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तसे नियोजन करावे. पुढील काळात आषाढी, दहिहंडी, स्वातंत्र्य दिन असे महत्त्वाचे सण-उत्सव आहेत. हे सण उत्सव साजरे करताना उत्साह कायम ठेवावा व घरातच थांबून ते साजरे करावेत. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. पाऊस आणि कोरोना या दोन आव्हानांविरुद्ध लढाई आहे. सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.