मालिका चित्रिकरणाचा पुन्हा एकदा शुभारंभ; तुझ्यात जीव रंगला’ शुटिंगला सुरुवात

0
361

मार्च महिन्यापासून मनोरंजन क्षेत्रातल्या सर्वच मालिकांची चित्रिकरणं बंद आहेत. त्यालाही आता जवळपास अडीच महिने उलटून गेले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिल्यानंतर अनेक चॅनल, निर्माते यांनी मालिकांच्या चित्रिकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच झी मराठीवर अनेकांची आवडती मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रिकरण कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात चित्रिकरण सुरू व्हावंं म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कंबर कसली होती. एकिकडे जिल्ह्याने चित्रिकरणासाठी अंथरलेलं रेड कारपेट आणि दुसरीकडे चित्रिकरण सुरू व्हावं म्हणून राज्य सरकारने चालवलेले प्रयत्न याचं हे फलित म्हणावं लागेल. येत्या सोमवारपासून म्हणजे 22 जून पासून या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. पूर्वी या मालिकेचं चित्रिकरण वसगडे गावाला व्हायचं. आता ते केर्ली या गावी होणार आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली असून अभिनेता हार्दीक जोशी, अक्षया देवधर यांसह अनेक कलाकार कोल्हापुरात दाखल झाले. अर्थात त्यालाही आता 10 दिवस उलटून गेले आहेत.

गेल्या अडीच महिन्यांपासून अनेक चॅनेलवर जुन्या मालिका दाखवल्या जात होत्या. पण आता पुन्हा एकदा नवीन एपिसोडसह आपल्या आवडतीच्या मालिका प्रसारित होणार आहेत. यावेळेस पहिल्यांदा या मालिकेतील सर्व कलाकारांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. ही टेस्ट मालिकेतील सर्व कलाकारांची निगेटिव्ह आली आणि त्यांना नियमानुसार १० दिवस हॉटेलमध्ये तर ४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. नंतर पुन्हा त्यांची स्वॅब तपासणी होईल. ती निगेटिव्ह आल्यानंतर चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. सोमवारपासून चित्रिकरण सुरू झालं तर पुढच्या आठवड्यात प्रेक्षकांना लॉकडाऊननंतरचा नवा एपिसोड पाहता येणार आहे. या वृत्ताला झी मराठी वाहिनीनेही दुजोरा दिला आहे.

येत्या सोमवारपासून जरी चित्रिकरण सुरू होणार असलं तरी आधी सर्व कलाकार, तंत्रज्ञ आदींना घेऊन लोकेशवर मॉकशूट होणार आहे. म्हणजे, नेमकं चित्रिकरण कसं करायचं. काय नियम पाळायचे. अंतर कसं ठेवायचं आदी गोष्टी समजावून सांगितल्या जाणार आहेत. त्यानंतर चित्रिकरणाला सुरूवात होईल.