रणजीमध्ये 700 पेक्षा ज्यास्त बळी टिपणाऱ्या दिग्गज गोलंदाज राजिंदर गोयल यांचे निधन

0
321

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे राजिंदर गोयल यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 77 वर्षीय फिरकीपटू राजिंदर यांनी रणजीमध्ये 750 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत इतर कोणताच गोलंदाज 600+ विकेट घेऊ शकला नाही. बीसीसीआयसह अनेक माजी क्रिकेटर्सनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात २५ पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा १५ वेळा केला. हरयाणाच्या गोयल यांनी १५७ सामने खेळले. ५५ धावांत ८ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी ५९ वेळा एका डावात ५ बळी तर १८ वेळा एका सामन्यात १० बळी टिपण्याची किमया साधली. त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीत १,०३७ धावाही केल्या. राजिंदर गोयल यांनी पतियाळा, पंजाब आणि दिल्लीकडूनही खेळले आहे. परंतू, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. यावर बोलताना त्यांनी मागे एकदा म्हटले होते की, ‘मी चुकीच्या काळात जन्म घेतला. बिशन सिंह बेदी संघात असताना माझे खेळणे अवघड होते.

भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील गोयल हे एक दिग्गज गोलंदाज होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक ६४० बळी गोयल यांच्या नावावर होत्या. एकूण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ७५० विकेट्स मिळवले होते. वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते. पण या दिग्गज गोलंदाजाला भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करायला मात्र मिळाले नाही. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने गोयल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

गोयल यांना एकदा भारताच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले होते. १९७४-७५ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील कसोटी सामना बंगळुरु येथे खेळवण्यात येणार होता. त्यावेळी बिशनसिंग बेदी यांना काही कारणास्तव संघाबाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी गोयल यांना भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची सर्वात चांगली संधी होती. पण त्यावेळी अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीत गोयल यांचे नाव घेण्यात आले नव्हते.
BCCI सह काही माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या निधनाबाबत काही आठवणी जागवल्या आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.