सायबर गुन्हा (क्राईम) नक्की असते तरी काय?

0
1009

आपण ‘इन्फॉरमेशन युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दररोजच्या जीवनातील विविध पैलूंमधील तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा वाढता वापर, यामुळे सायबर अपराधी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर हल्ला करत आहेत.

सायबर गुन्हा किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणक व इंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गुन्हे हे सायबर क्राईमच्या श्रेणीत येतात. इंटरनेटवरून क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून पैसे काढून घेणे, ब्लॅक मेलिंग, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क, कोणत्याही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हायरस पाठवणे, आपत्तीजनक किंवा धमकीवजा संदेश पाठवणे या बाबींचा सायबर क्राईममध्ये समावेश होतो.

इंटरनेट-डिजिटल क्रांतीमुळे एका क्लिकवर सर्व जग सामावले गेले आहे. मित्र, नातेवाईकांशी चॅटिंग करण्याबरोबरच खरेदी, बॅकिंग व्यवहार या सर्व गोेष्टी एका बटणावर सामील झाल्या आहेत. मात्र जगाला कवेत घेणारे इंटरनेट हे आपले जगही बदलू शकते. सोशल मीडियावर केलेली गडबड आपल्या अंगलट येऊ शकते. या गोष्टींबाबात आजही वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत.

सायबर गुन्हे अशा प्रकारे आहेत

  • ई-मेलद्वारे होणारा छळ
  • सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)
  • सायबर पॉर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)
  • सायबर डीफमेशन (बदनामी)
  • मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)
  • ई-मेल स्फुफींग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)

सायबर गुन्हेगारांसाठी कायदा आहे, मात्र तो गुन्हा सिद्ध करणे कठीण असते. सोशल साईटवर हे गुन्हेगार आपल्या नावाने अनेक प्रकारचे खाते सुरू करतात आणि कायदेशीरपणे आपला ङ्गोटोही अपलोड करतात. आज आपल्याला पंतप्रधानांपासून बॉलिवूड कलांकारांपर्यंत अनेक खोटी खाती या सोशल साईटस्‌वर पाहवयास मिळतील.

इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे आणि निश्चितच ते समाजासाठी एक वरदानही आहे पण त्याचा वापर तेवढा आपण सजगतेने केला पाहिजे तरच आपण त्यातील इंटरनेट बँकिंग सारख्या साधनांचा चांगला फायदा आणि सोशल नेटवर्कींगचा सुद्धा सकारात्मक उपयोग करू शकतो