बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. याचे उद्घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. यंदा या वास्तूला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. आज त्याबद्दल काही माहिती आपण देणार आहोत.
बालगंधर्व रंगमंदिराचा इतिहास:-
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व (जन्म : नागठाणे (सांगली), महाराष्ट्र, २६ जून १८८८; मृत्यू : पुणे, १५ जुलै १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारून संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहिलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.
भाऊराव कोल्हटकरांच्या इ.स. १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले. इ.स. १९२९ सालच्या ४२ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १५ जुलै १९६७ रोजी वृद्धापकाळामुळे व दीर्घ आजाराने बालगंधर्वांचे निधन झाले.
इ.स. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतिमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्या हस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते. सुमारे बत्तीस लाख रुपये खर्चून बांधलेली ही वास्तू खरोखरीच सर्वदृष्ट्या बालगंधर्वांच्या स्मृतीला शोभेशी अशीच आहे. बालगंधर्वांचा जन्म पुण्यातला आणि मृत्यूही यदृच्छेने याच शहरी घडलेला. त्यांच्या हयातीत त्यांच्या ऐन उमेदीच्या वर्षात, पुणेकरांच्या दोनतीन पिढ्यांनी त्यांना विभूतीसमान मानलेले. त्यामुळे एक भव्य वास्तू त्यांच्या नावे पुण्यात उभी राहावी आणि तिचे उदघाटन बालगंधर्वांच्या जन्मदिनी, म्हणजे २६ जूनला, व्हावे हे उचितच होते.
बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. नाट्यगृहाचे सभागृह बंदिस्त असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे. रंगमंच ३०’ x ४४’ x २२’ या आकाराचा असून मंचासमोर मोठा दर्शनी पडदा आहे. प्रेक्षागृहाची क्षमता तळमजल्यावर ६६९ आसने व सज्ज्यात ३२० आसने इतकी आहे. नाट्यगृहाला लागून वरच्या मजल्यावर एक मोठे कलादालनही आहे, तेथे नित्यनियमाने पुस्तकांची, चित्रांची व अन्य कला वस्तूंची प्रदर्शने भरत असतात. नाट्यगृहाचे आवार बरेच मोठे असून तिथे थोडीफार बाग केली आहे. आवारात रिकामी जागाही भरपूर असून तिथे मौसमी वस्तूंच्या विक्रीची दुकाने भरवली जातात.
पुणे महानगरपालिकेतर्फे इ.स. २०११ सालापासून बालगंधर्व (मुख्य) पुरस्कार आणि बालगंधर्व सहपुरस्कार हे पुरस्कारही त्यांच्या स्मृतीनिमित्त सुरु केले आहेत. दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त तेथे मोठा कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो.