गोवा राज्यातील पर्यटन आराखड्याच्या धर्तीवर कोकणातील चार जिल्ह्यांतील आठ ठिकाणी बीच शॅक पर्यटनास राज्य मंत्रिमंडळाने आज (25 जून) मंजुरी दिली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार असून, कोकण विभागाच्या दृष्टीने हा मोठा निर्णय आहे. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील हे धोरण असणार आहे. या कुट्या तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असतील.
कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. स्वच्छ, निळाशार समुद्र, मनमोहक आणि हिरवाईने नटलेला परिसर नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. आता गोव्याच्या धर्तीवर कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही प्रायोगिक तत्त्वावर शॅक्सची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला तर चालना मिळणार आहे. शिवाय, स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास मान्यता मिळाल्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना ८० टक्के रोजगार देणे आवश्यक आहे, ही अट देखील असणार आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या ८ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील.
बीच शॅक धोरणामुळे गोव्यापेक्षा उत्तम धरतीचे पर्यटन कोकणात उभे राहणार आहे. बीच शॅक अंतर्गत समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी चहा, नाश्ता, भोजन व मर्यादित स्वरुपात बियरदेखील विकण्याची परवानगी दिली जाणार आहे. सोबतच कोणतेही कायमस्वरुपी बांधकाम न करता स्थानिकांना रोजगाराची संधी यातून निर्माण होईल.
गोवाच्या धर्तीवर बीच शॅक्सची उभारणी अशी असेल
- एका चौपाटीवर कमाल 10 शॅक्स उभारता येतील. या शॅक्सचे तीन वर्षाकरता वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार 15 फूट लांबी आणि 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल.
- गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरता परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.
- तसेच या शॅक्सकरता पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहिल. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल. तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ती परत केली जाईल.
- सकाळी 7 ते संध्याकाळी 7 यावेळेत ही शॅक्स खुली राहतील. याबाबतचे सारे नियम हे पर्यटन विभागानेन आखून दिलेले असतील.