अनलॉकमध्ये निष्काळजीपणा नको: पंतप्रधान मोदी

0
312

(पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली)

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. आपण करोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वेळेवर केलेलं लॉकडाउन आणि इतर महत्त्वाचे निर्णय यामुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचं पालन करण्यात आलं. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

आपल्याकडे पावसाळ्यात शेती क्षेत्रात जास्त काम असतं. इतर क्षेत्रांमध्ये जरा सुस्ती असते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत केला जाईल. म्हणजे ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणारी ही योजना आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये देखील लागू राहील. सरकारकडून या ५ महिन्यांसाठी ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना प्रत्येक महिन्याला ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील. त्यासोबतच प्रत्येक महिन्याला १ किलो चना मोफत दिला जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या विस्तारासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे.

पंतप्रधानांच्या भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे:

  • वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर
  • अनलॉकमध्ये वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीत दुर्लक्ष केलं जात आहे. ही चिंतेची बाब आहे.
  • लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र आता देशातील नागरिक, संस्था पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.
  • कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.
  • भारतातही स्थानिक सरकारला अधिक काळजी घ्यायला हवी. भारतात गावाचा प्रधान असो की नगरसेवक सर्वांनी काळजी घ्यायला हवी.
  • लाखो लोकांचे प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना रोखायला हवं, टोकायला हवं आणि समजवायला हवं. स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधानसुद्धा नाही.
  • गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार रुपये जमा केले गेले.
  • प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करण्याचा विचार आहे. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ दर महिन्याला मिळेल.