राष्ट्रीय डॉक्टर दिन: सुपरहिरो डॉक्टरांना सलाम

0
591

(डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते)

भारतात 1 जुलै रोजी आणि अमेरिकेत 30 मार्च रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ (Doctor’s Day 2020) साजरा केला जातो. सर्व डॉक्टरांच्या सेवेबद्दल आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याचा हा इतिहास खूप अभिमानास्पद आहे. आयुष्यात डॉक्टरांचे स्थान किती महत्वाचे आहे, हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. डॉक्टरला आपण एकप्रकारे देवाच्या रूपात पाहिले जाते.

रूग्णांच्या सेवेसाठी 24X7 कार्यरत असणार्‍या डॉक्टर्सना यादिवशी धन्यवाद दिले जातात. त्यांच्या सेवेप्रती या दिवशी आदर आणि आभार व्यक्त केले जातात. याकरिता ग्रिटिंग्स,मेसेज पाठवले जातात.

राष्ट्रीय डॉक्टर दिवसाची सुरुवात कशी झाली?

भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. 1991साली भारतामध्ये डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी 1961 साली डॉ विधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच ‘भारतरत्न’ बहाल करण्यात आला आहे.

डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 साली बिहारमधील पटना येथे झाला. फिजिशियन डॉ विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.

यंदा डॉक्टर्स डे का महत्त्वाचा आहे हे सर्वांना माहिती आहे कारण म्हणजे कोरोना व्हायरस. ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा सामान्य नागरिकांना दिलासा देणारे डॉक्टर्स करोना नामक संकट पळवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कोरोना योद्धे २४ तास झटत आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी फ्रण्ट लाईन योद्धा म्हणून लढत आहेत. प्रत्येक परिस्थितीत आपलं कर्तव्य निभावत रुग्णांना चांगले उपचार कसे मिळतील यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात.या व्हायरस विरुद्ध लढताना काहींनी तर कित्येक दिवस आपल्या कुटूंबियांना सुद्धा पाहिले नाही आहे. आज त्यांच्यामुळे का होईना आपण सुरक्षित घरी आहोत तर कित्येक रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

डॉक्टर्स आणि पेशंट मधला संवाद काहीसा कमी होतोय का?

डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. मात्र आता व्यवसायिक जगात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातही व्यवहारिक नाते निर्माण होऊ लागले आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही संपुष्टात येऊ लागली आहे. यात समाजव्यवस्थाच दोषी दिसत आहे.अलीकडे वैद्यकी क्षेत्राला व्यावसायिक स्वरुप आल्याने फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. मात्र रुग्णांशी कौटुंबिक, जिव्हाळचे नाजूक आणि हळुवार संबंध जपणारी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जपली पाहिजे. त्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वासार्ह संबंध असले पाहिजेत. रुग्णांनीही डॉक्टर्सवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे.

आजकाल आपण पाहतो की कोणताही रुग्ण दगावला तर डॉक्टर्सला मारहाण केली जाते तसेच तोडफोड केली जाते. या गोष्टी टाळायला पाहिजे कारण कोणताही डॉक्टर रुग्णाला कशाला मारेल किंवा त्याला वाचवणार नाही. कधीतरी काही गोष्टी ह्या डॉक्टर्स च्या हातामध्ये नसतात. यावेळी आपण त्यांना समजून घेतले पाहिजे.

तसेच डॉक्टरांनीही पेशंट कडून पैसा उकळणे, त्याचे बाजारीकरण करणे थाबंवले पाहिजे. जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून शपथ घेतात यामध्ये डॉक्टरांची कर्तव्ये, त्यांचे आचरण, त्यांची रुग्णाप्रती असणारी भावना या गोष्टी असतात. जर शपथेचे पालन झाल्यास सर्व वैद्यकीय सेवा चांगल्या दर्जाची होईल. ज्यादिवशी डॉक्टर्स आणि पेशंट मधला होणारा गैरसमज दूर होईल त्यादिवसापासून पुन्हा एकदा माणुसकीचे नाते तयार होईल.

सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा आणि सर्वांना मनापासून धन्यवाद.