वाह वेस्ट इंडिज; पहिल्याच कसोटीत इंग्लंडवर धमाकेदार विजय

0
165

करोनानंतर चार महिन्यांनंतर प्रथमच खेळवण्यात आलेल्या सामन्यात अखेर बाजी मारली ती वेस्ट इंडिजने. इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाछलाग करत वेस्ट इंडिज इंग्लंडवर थरारक विजय मिळवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटदेखील ठप्प होते. मात्र मागील आठवड्यात कोरोनानंतरचा पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला.

इंग्लंड – वेस्ट इंडिजमध्ये सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला आहे. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी खेळत संघाला पहिला विजय मिळवून दिला. शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजने तीन गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट, शाय होप आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर बाद झाले. पहिला गडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला होता. जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतला. त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. चेस ३७ धावांवर बाद झाल्यावर ब्लॅकवूडने होल्डरच्या साथीने डाव पुढे नेला. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर होल्डरने विजय मिळवून दिला. संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी मिळवून दिली.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. डेन्टलीनेही २९ धावा केल्या. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी केली. हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले. क्राव्हलीने ७६ तर स्टोक्सने ४६ धावा केल्या. त्यानंतर जोफ्रा आर्चरने (२३) काही काळ झुंज दिली, पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या. गॅब्रियलने ५, होल्डर-चेसने प्रत्येकी २ तर होल्डरने १ बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद २०४ धावा

वेस्ट इंडिज पहिला डाव – सर्वबाद ३१८ धावा

इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद ३१३ धावा

वेस्ट इंडिज दुसरा डाव – ५ बाद २०४ धावा

(वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ४ गडी राखून विजय )