राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हातात घेत आपल्याच सरकारला अडचणीत आणणाऱ्या सचिन पायलट यांना काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे.
काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. पायलट यांच्यासह त्यांच्या गोटात असणाऱ्या दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
चिन पायलट आणि त्यांचे समर्थक भारतीय जनता पक्षाने रचलेल्या राजस्थान सरकार पाडण्याच्या कटकारस्थनात सहभागी झाले आणि ही अत्यंत दु:खदायक गोष्ट आहे. याच कारणामुळे अखेर काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला, असे या निर्णयानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाले. ही कारवाई करताना काँग्रेसने सचिन पायलट यांच्या काँग्रेसचे सदस्यत्व कायम ठेवले आहे.
गेल्या 72 तासांपासून सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस नेत्यांनी सचिन पायलट आणि अन्य सहकारी मंत्री आणि आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस नेतृत्वाने सचिन पायलटशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला. केसी वेणुगोपाल सचिन पायलटशी बर्याच वेळा बोलले. त्याआधी सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्यापासून ते अहमद पटेल यांनी सर्वांनी प्रयत्न केले. पण, सचिन पायलट हे अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता मनधरणीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. अखेरीस पायलट यांनी गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन कधी हटवणार आणि आपल्याला कधी मुख्यमंत्री करणार असं आश्वसान तरी द्यावं, अशी शेवटची मागणी पक्षाकडे केली. पण, पक्षाने त्यांना सीएलपीच्या बैठकीला जाण्याचा सल्ला दिला. तसंच या बैठकीनंतर गहलोत यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. पण, पायलट यांनी बैठकीला जाण्यास नकार दिला.
गेहलोक यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवावे, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली होती. तसेच पक्षाने बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसने त्यांना कायमचा धडा शिकविण्याचा इशारा दिला. आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले.
राजस्थानात २०१८ मध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हापासूनच सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा, संघर्ष सुरु झाला. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्याजागी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हाच सत्ता संघर्षाची बीजं रोवली गेली. काँग्रेस राजस्थानात सत्तेवर आली, तेव्हा सचिन पायलट प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राजस्थानात काँग्रेसला सत्तेवर आणण्यात आपला प्रमुख वाटा आहे, असे त्यांचे म्हणणे होते.