राडा रॉक्स या मराठी चित्रपटातून पदार्पण केलेल्या तन्वी किशोरने मराठी सोबतच तामिळ आणि मल्याळम चित्रपाटातही काम केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वांनी एकी दाखवली तर चित्रपट सृष्टीला चांगले दिवस येतील असे माझे मत आहे. असे का तिला वाटतंय यासाठी आम्ही लॉकडाऊन आणि आगामी चित्रपट अशा बऱ्याच विषयावर तन्वी किशोरसोबत संवाद साधला.
१. लॉकडाऊन मध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टी मिस केल्या?
सर्वात जास्त तर मी माझे काम मिस करत आहे. शुटींग आणि सेटवरच्या गोष्टी प्रचंड आठवत आहे. पुणेकर असल्याने सर्वसामान्य आयुष्य म्हणजे शॉपिंग असो वा खाद्यभ्रमंती ह्या गोष्टी आठवत आहे. नातेवाईक असो वा मित्रपरीवार यांना कित्येक दिवस भेटलो नाही आहे. कधी एकदा या सर्व गोष्टी पुन्हा एकदा अनुभवता येतील याचाच विचार सुरु आहे.
२. लॉकडाऊन काळात काय काय नवीन गोष्टी केल्या?
नवीन गोष्टी शिकल्या म्हणण्यापेक्षा ऐरवी ज्या गोष्टी करायला वेळ मिळत नव्हता त्या गोष्टी करण्यावर भर दिला. स्वयंपाकची प्रचंड आवड असल्याने विविध पदार्थ बनविले. मला निसर्गाची प्रचंड आवड असल्याने बागकाम केले. निरनिराळया प्रकारची झाडे घराभोवती लावली. लिखाण करणं हा माझा आवडता छंद आहे पण शूटिंगमुळे वेळ मिळत नव्हता त्यामुळे मी या लॉकडाऊन मध्ये भरपूर लिखाण केलेय. याबरोबरच मी पॉडकास्टही सुरु केलेय.तसेच मी घरघुती मास्कही बनवायला शिकले. पहिल्यांदाच कुटूंबियांना वेळ देताना इतके दिवस घरी राहायला मिळाले त्याचाही एकप्रकारे चांगला फायदा झाला.
३. विजेता सिनेमानंतर आगामी चित्रपट कोणते असणार आहेत?
विजेता सिनेमा हा लॉकडाऊन होण्याआधी दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता त्यामुळे तो पुन्हा एकदा चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रदर्शित होईल. तसेच विश्वास जोशी यांचा “घे डबल” हा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ह्या सिनेमात माझ्यासोबत भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे आणि भाऊ कदम अशी स्टारकास्ट असणार आहे. तसेच मी लॉकडाऊनच्या आधी पहिला तमिळ चित्रपट केला आहे आणि तो सुद्धा एक भयपट (हॉरर) चित्रपट आहे. हा थ्रीडी चित्रपट असून मी आतुरतेने त्याची वाट पाहत आहे. मी एक मल्याळम चित्रपट सुद्धा करत असून त्याचे नाव प्रतिमुगम आहे. प्रतिमुगम म्हणजे दुसरा चेहरा किंवा मुखवटा. आतापर्यंतचा माझा सर्वात आवडती भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे.
४. तमिळ आणि मराठी हे दोन्ही चित्रपट करताना काय फरक जाणवला?
पहिली म्हणजे भाषा. मला तमिळ भाषा बोलताना काही दिवस त्रास जाणवत होता. जशी आपण मराठी भाषा पटकन बोलून जातो तसा तमिळ बोलताना अडचण येत होती. पण नंतर ती भाषाही मी शिकले. तमिळ मध्ये काम करताना एक गोष्ट चांगली वाटली ती म्हणजे सेटवर खूप चांगली वर्तणूक आणि भेदभाव दिसत नाही. तमिळ चित्रपट सृष्टीने त्यांची संस्कृती टिकवून ठेवली आहे. कितीही मोठा कलाकार असला तरी केळीच्या पानावर जेवण करतात तसेच त्यांचे प्रेक्षकही त्यांच्या चित्रपटाला डोक्यावर घेतात.
मराठी चित्रपटातील सेटवर पण वर्तणूक चांगली असते पण आपण आपली संस्कृती न जपता थोडे फॉरवर्ड होत चाललो आहोत. तसेच आपले प्रेक्षकही मराठी पेक्षा हिंदी सिनेमाकडे जास्त वळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आपल्याच लोकांनी जर ठरविले तर मराठी चित्रपटसृष्टीचाही दबदबा लवकरच निर्माण होईल यात शंका नाही.चित्रपट करत असताना मराठी प्रेक्षक आपल्याकडे कसा आकर्षित होऊ शकतो त्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तसेच आपण जास्तीत जास्त आपल्या चित्रपट सृष्टीत सुपरस्टार्स बनवायला पाहिजे.
५. मराठी सिनेमांना ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत नाही अशी चर्चा ऐकायला मिळतेय?
आपली मराठी चित्रपटसृष्टी कुठेतरी कमी पडतेय असे नेहमी वाटते. आपण जर सर्वानी एकत्र येऊन एकीने काही प्रश्न सोडवले तर ओटीटी प्लॅटफॉर्म असू दे कि चित्रपटाला थिएटर्स ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. एकाच दिवशी ५ ते ६ मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षक विभागले जातात त्यासाठी सर्वांनी संवाद साधून एकमेकांना मदत केली पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना आपण कशा प्रकारे खेचू शकतो याबद्दलही विचार करून नवनवीन गोष्टी अमलात आणणे गरजेचे आहे. आपण आपले मराठी चित्रपट फक्त महाराष्ट्रातपूर्ती मर्यादित न ठेवता बाहेरच्या देशात जे मराठी प्रेक्षक आहे त्यापर्यत सुद्धा तो चित्रपट पोहचविला पाहिजे जेणेकरून मराठी चित्रपट अजून चांगली प्रगती करेल.
६. सुशांत सिंग आत्महत्या प्रकारानंतर घराणेशाही वर टीका होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्येही घराणेशाही सारखी गोष्ट अनुभवयास मिळाली आहे का?
खरे तर हे जे काही आता घराणेशाही वर टीका सुरु आहे त्याच्या मी विरोधात आहे. जर आपल्यामध्ये प्रतिभा असेल तर आपण नक्की पुढे जाणार या विचाराशी मी सहमत आहे. मी जेव्हा या सृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा कोणीही ओळखीचे नव्हते. पण मी आतापर्यत जे काही चित्रपट केले आहे ते प्रतिभेमुळे आणि माझ्या क्षमतेमुळेच असे मला वाटते. आपण घराणेशाहीवर टीका करत असताना आपण आपल्याच कलेचा अपमान करतो असे मला वाटते. अजूनपर्यंत तरी मला मराठी चित्रपट सृष्टीमध्ये घराणेशाही दिसली नाही आहे.
७. तुमचा आवडता ड्रीमरोल कोणता? लॉकडाऊन नंतर शूटिंग करताना कशाप्रकारे काळजी घ्याल?
मला मराठी चित्रपटात ऐतिहासिक भूमिका करण्याची खूप ईच्छा आहे. त्या संधीची मी आवर्जून वाट पाहत आहे. कोरोनामुळे जीवन बदलले आहे त्यामुळे शुटींगला जातानाही योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडेल. सेटवर असताना बाहेरील पदार्थपेक्षा घरघुती जेवणाला प्राधान्य असेल. सोशल डिस्टंसिंगवर लक्ष असेल.
८. कोरोना पार्श्वभूमीवर पुणेकरांना काय सांगाल?
खरे तर पुणेकर हे सुज्ञान असून त्यांना काही सांगायची गरज नाही आहे. तरीही घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि शक्यतो घराबाहेर विनाकारण पडू नका. जसे आपण दुपारी १ ते ४ आराम करतो तसाच अजून जास्तीत जास्त वेळ काही दिवस घरामध्ये घालवा. सर्व डॉक्टर्स आणि पोलीस जे आपल्यासाठी अहोरात्र काम करत आहे त्यांना सहकार्य करा.