अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष : राजकारणातील दोन ध्रुव तारे आणि प्रतिस्पर्धी नेते

0
888

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रतिस्पर्धी नेत्यांचे एकाच दिवशी वाढदिवस असण्याचा योगायोग तसा नवा नाही. राज्याच्या राजकारणातील 2 मोठी नावं शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला येतो. योगायोगाने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी येतो.

दोन दिवसात खेळ खल्लास झालेल्या मंत्रिमंडळात अजितदादा व देवेंद्रभाऊ दोघेच सहभागी होते. भाजपचे १०५ शिलेदार (आमदार) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आणखी तीसेक आमदार फोडण्याच्या तयारीने हा उद्योग करण्यात आला होता. कर्तव्यदक्ष राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावेळी आपली कार्यक्षमता सिद्ध करताना भल्या पहाटे दोघांना शपथ दिली होती. सकाळीच अवघ्या देशाला त्यामुळे मोठा धक्का बसला होता. मागे सहा महिन्यांपूर्वी एकाचवेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाल्याची बातमीही खूप दिवस चर्चेत होती आणि आजही त्यावर मोठ्या प्रमाणात कुजबुज ऐकायला मिळतेच.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वयात साधारण 10 वर्षांचा फरक आहे. अजित पवार यांनी 1991 ला राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते बारामतीचे खासदार म्हणून निवडून आले. पण त्याचवेळी केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस त्याच दरम्यान म्हणजे 1992 मध्ये कायद्याची डिग्री घेऊन कॉलेजातून बाहेर पडले होते. त्याचवर्षी ते नागपूरमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते नागपूरचे महापौरही झाले. एकअर्थी थोड्याबहुत फरकानं दोघांची राजकाणातली एन्ट्री एकाच कालावधीमध्ये झाली.

1999 पासून खऱ्या अर्थानं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध यायला सुरुवात झाली. 1999मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तोपर्यंत राज्यमंत्रिपदाचा अनुभव असलेल्या अजित पवारांना पहिल्यांदा सत्तेत आलेल्या आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्याकडे जलसंपदा खात्याचा कारभार आला.

अल्पावधीतच देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासू, तरुण आणि तडफदार आमदार म्हणून नावलौकिक कमावला. विधानसभेतली वेगवेगळी आयुधं वापरून सरकारला धारेवर धरणारे विरोधीपक्षातले एक महत्त्वाचे नेते म्हणून ते उदयाला यायला लागले. अर्थसंकल्पावरील सोप्या आणि सुटसुटीत मांडणीमुळे देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या मनातसुद्धा मानाचं स्थान मिळवलं. त्याच दरम्यान अजित पवार काही काळ राज्याचे अर्थमंत्री होते. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांसाठी ते कायम आवर्जून उपस्थित राहत. अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर राज्याच्या हितासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलं ट्युनिंग होतं, असं राजकीय निरिक्षक आणि अभ्यासक सांगतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा हे अत्यंत आक्रमक, स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. कोणतीही भीडभाड न ठेवता कोणाला कितीही वाईट वाटलं तरी त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट असते. प्रशासनावर अत्यंत पकड अजित पवारांची जमेची बाब आहे. दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालेले फडवणीस यांनी पाच वर्षाच्या कारभारामध्ये उत्तम प्रशासन आणि संघटनांवर मजबूत पकड सिद्ध करून दाखवली. अजित पवार जितके स्पष्ट असतील तितकेच विरोधातले चित्र फडवणीस यांचे आहे. कमी बोलणं आणि कृतीतून सर्वकाही करून दाखवून देणे ही फडणवीस यांची कार्यपद्धती आहे

राज्याच्या राजकारणावर आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवणाऱ्या या नेत्यांमधील एकाने साठी ओलांडली आहे तर दुसरा पन्नाशीच्या घरात पोहचला आहे,या दोन्ही नेत्यांच्या हातून महाराष्ट्राचे महान राष्ट्र व्हावे,राज्य सुजलाम सुफलाम व्हावे हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
.