बालवाडी ते बारावी ऑनलाईन शिक्षण; शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं ऑनलाइन वर्गांचं वेळापत्रक

0
294

राज्यात कोरोनाच्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात थेट शाळा सुरु न करता काही दिवस ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे.

शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणामधून पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना वगळले होते. मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाईन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीही अर्धा तासांची दोन सत्रे ठेवली आहेत. तर छोटा शिशू व मोठा शिशूतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अर्धा तासाचे सत्र ठेवले आहे.

हे आहे वेळापत्रक:-

१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.

२)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे.

३) तिसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे.

४) नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे.

https://help.twitter.com/en/twitter-for-websites-ads-info-and-privacy