पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्याच्या आजीबाईंची कसरत; व्हिडिओ होतोय व्हायरल

0
515

अनाथ नातींना सांभाळण्यासाठी वयाच्या चक्क ८५ वर्षाच्या एका वृद्ध महिलेला डोंबारी लाठी काठीचा खेळ दाखवून पोट भरायची वेळ आलेली आहे, त्या भर उन्हा पावसात रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ खेळत जगण्याची लढाई लढत आहेत. आजीबाई पुण्यात काठ्यांचा खेळ सादर करत असतानाचा व्हिडीओ शूट करुन कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला. अल्पावधीतच तो अनेक नेटिझन्सपर्यंत पोहोचला. शांता बाळू पवार या आजी रस्त्यावर लाठीकाठी खेळताना या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. आपलं कौशल्य सादर करत त्या पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी (Warrior Aaji) असं म्हटलं आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी एका आजीची अनोखी कसरत सुरू आहे. पुण्याच्या हडपसर परिसरात राहणारी ही आजी डोंबाऱ्याचा खेळ करते. महत्वाचं म्हणजे त्यातही तिचा स्वाभिमान आहे. ती कुणाकडे भिक मागत नाही, तर चित्तथरारक कसरती सादर करून प्रेक्षकांकडून मदतीची अपेक्षा ठेवते. त्यातून मिळणाऱ्या चार दोन रुपयांच्या कमाईवर ती स्वतःचा आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या पिलावळीचा घर गाडा चालवते. आजीला १७ नातवंडे आहेत आणि त्यांचे तिला शिक्षण करायचे आहे. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत. यामधील काही हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आजी स्वतः करतात. मागील तीन महिन्या पासून करोनाचे संकट आले आणि हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू झाली. अनेक दिवस पाच मुलीसह आजी उपाशी झोपल्या, मात्र त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. शेवटी लॉकडाऊन उठल्यानंतर आजीने रस्त्यावर उतरून काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात केली. ८५ वर्षीय आजीची ही अचंबित करणारी करामत पाहून नागरिकांचेही त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. अनेकांनी या आजीला सोशल मीडियावर व्हायरल करून केल्याने अवघ्या दोन तीन दिवसातच त्या सोशल मीडियावरील स्टार झाल्या

या आजीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्या एका सिनेमातही काम केले आहे.आतापर्यंत आजीने तीन सिनेमात काम केले आहेत. गीता और सीता, शेरणी आणि त्रिदेव या चित्रपटात आजी चमकली आहे. “मी शाळा हायस्कूलमध्ये मुलांसमोर कार्यक्रम केले आहेत. परंतु नातवांनी या खेळात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना शिक्षण द्यायचं आहे,” असा निर्धार आजींनी बोलून दाखवला.

सध्या महामारीच्या काळात त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलीय. अशा परिस्थितीत त्यांच्यातील जगण्याची जिद्द आणि ऊर्जा कायम आहे. म्हणूनच त्या आजही कसरतीचे खेळ सादर करताहेत. अशा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आजीबाईला मनापासून सलाम.