तारक मेहता का उल्टा चष्मा; गोकुळधाम सोसायटीने केली १२ वर्ष पुर्ण

0
286

हिंदी टीव्ही मालिकांमध्ये नवनवे विक्रम करणारी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिकेने काल २८ जुलैला आपली १२ वर्षे म्हणजे एक तप पूर्ण केले आहे. त्यानिमित्त सेट्सवर सेलिब्रेशन होणार आहे पण साधेपणानी. या मालिकेचे निर्माते असीतकुमार मोदी यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. तारक मेहता का उल्टा चष्माची कथा जेठालाल गडा या गुजराती व्यापाऱ्याच्या आणि तो राहत असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील कुटुंबियांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आहे. वास्तविक ही मालिका चित्रकार स्तंभलेखक, पत्रकार आणि नाटककार तारक मेहता यांनी चित्रलेखाच्या गुजराती साप्ताहिकाच्या मासिकासाठी लिखित ‘દુનિયા ને ઉંઢા ચશ્મા (दुनिया ने उंढा चश्मा)’ यावर आधारित आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं फॅन फॉलोईंग आज कुठल्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. यावरुनच ‘तारक मेहता’ मालिकेच्या लोकप्रियता अंदाज आपल्याला येतो.

गोकुळधाममधला जेठालाल, दयाबेन, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, ‘दुनिया हिला दूंगा’ म्हणणारा पत्रकार पोपटलाल, खोडकर टप्पू, अय्यर, डॉ. हाथी, सोढी ही सगळी पात्रं आज प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहेत. जेठालालच्या आयुष्यात दररोज काहीतरी अडचण येते आणि ती सोडवण्यासाठी सगळी सोसायटी धावून येते. या सगळ्या प्रकारात हास्याचे तुषार उधळले जातात. त्यामुळेच सलग १२ वर्षे या मालिकेनी प्रसिद्धीचे उच्चांक गाठले आहेत. यातील कथानक, कलाकारांचा अभिनय, व्यक्तिरेखा सगळंच सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं असल्यामुळे ते प्रेक्षकांना अधिक भावतं.

आता या मालिकेनं २८०० हून अधिक भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेतून केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात नाही तर मालिकेच्या शेवटी एक सामाजिक संदेशही दिला जातो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींना मालिकेतून हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. त्यामुळं मालिकेचं विविध स्तरातून कौतुक झालं आहे.ह्या सीरिअल मधून सर्वात चांगला संदेश जो आपल्याला नेहमी मिळतो तो म्हणजे सर्व धर्म समभाव. सर्व जण एकत्र येऊन विविध उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करतात त्यामुळे सर्वाना एकत्रित राहण्याचा सामाजिक संदेश मिळतो.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आपल्या महाराष्ट्रातही इतकी लोकप्रिय झाली आहे की ही मालिका फक्त मराठी या वाहिनीवर ‘गोकुळधामची दुनियादारी’ या नावाने मराठी भाषामधून प्रदर्शित झाली आहे.