मराठी चित्रपटसृष्टी: मराठी प्रेक्षक जागा हो

0
1069

कोरोनामुळे सर्व जीवन ठप्प झाले आहे. पहिल्यादांच सिनेमा असो वा मालिका या सर्वाचेच चित्रीकरण तब्ब्ल तीन महिने बंद होते. आता अनलॉकमध्ये सर्व काही हळू हळू सुरळीत सुरु असताना सिनेमागृह अजूनही बंद आहेत. सिनेमागृह बंदअसले तरी बॉलिवूड हिंदी सिनेमा एक एक करून ओटीटी वर प्रदर्शित होताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मराठी सिनेमांचे काय हा प्रश्न अजून पडलेलाच आहे.

सिनेमागृह होते त्यावेळी मराठी सिनेमाला थिएटर्स मिळायचे नाही आणि आता तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्र पाहायला मिळत आहे. मराठी सिनेमाला हक्काचे असे ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत नसल्याने ते प्रदर्शित करायचे कुठे हा प्रश्न आता पडला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले आहेत. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. याला जबाबदार कोण हा प्रश्न कोणी विचारला तर नक्कीच आपणही प्रेक्षक म्हणून तेवढेच जबाबदार आहोत असे वाटते.

साऊथमध्ये कधी गेला तर तेथील प्रेक्षक पहिला प्रतिसाद त्यांच्या भाषेतील सिनेमाला देतात त्यानंतर हिंदी सिनेमांचा नंबर लागतो. तेथील प्रेक्षकांनी तिथल्या प्रत्येक कलाकाराला सुपरस्टार बनविले आहे हे म्हणायलाही हरकत नाही. येथे मात्र महाराष्ट्रात आपण हिंदी सोबत तामिळ सिनेमालाही पुढे घेऊन जातोय मात्र आपला मराठी सिनेमा कुठेच दिसत नाही. आपणच आपल्या भाषेतील सिनेमाला पुढे घेऊन नाही जाणार तर कोण घेऊन जाणार. जर आपण सर्वांनी एकत्र येऊन ठरविले तर आपला मराठी सिनेमाही साता समुद्रापलीकडे जाऊन नाव कमवू शकतो पण त्यासाठी आपणही आपला सिनेमा पहिला पाहायला हवा.

आपल्याकडे मराठी सिनेमाही आता नवनवीन विषय घेऊन येत आहे तसेच अव्वल दर्जाचे कलाकार मेहनत करत आहे. आपणही आपल्या कलाकारांना सुपरस्टार बनविले तर आपले सर्वच सिनेमे भरपूर चालतील. सिनेमागृह काय तर ओटीटी प्लॅटफॉर्मलाही मराठी सिनेमांची दखल घ्यावीच लागेल.

मराठी प्रेक्षकांसोबतच मराठी कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनीही यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मराठी सिनेमा कशी प्रगती करेल किंवा त्याला स्वतंत्र असे ओटीटी प्लॅटफॉर्म कसे मिळवता येईल याबाबत एक आरखडा केला पाहिजे. कधी कधी एकाच दिवशी मराठी ५ ते ६ सिनेमा प्रदर्शित होतात त्यामुळे प्रेक्षकवर्ग विभागला जातो. येथूनपुढे या गोष्टी कशा टाळता येतील याबाबतही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. जर सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर मराठी चित्रपटसृष्टीला कोणीही रोखू शकणार नाही आणि जगभरात मराठी चित्रपट आपला झेंडा फडकावेल यात काडीमात्र शंका नाही.

तर चला आपण एक सृजन नागरीक किंवा एक मराठी प्रेक्षक म्हणून एक प्रतिज्ञा करूया की मी माझ्या मराठी चित्रपटाला प्रथम प्राधान्य देईल. माझा मराठी चित्रपट आणि त्यातील कलाकारांना प्रत्येकवेळी पाठींबा देईल.

तर चला मराठी चित्रपट सृष्टीचे स्थान उंचावण्यासाठी आणि पुढील चांगल्या वाटचालीसाठी काम करूया… !!!

येऊया एकत्र,उठवूया रान ,
मराठी आहोत, देऊया मान…

कारण मराठी चित्रपटसृष्टी
आहे आपली आन बाण शान…!!