पुण्यात लॉज, गेस्ट हाऊस, निवासी सुविधा, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यात येणार आहेत. अटी आणि शर्तीनुसार पालिका प्रशासनाने उद्यापासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली.
मॉलमध्ये मुलांसाठी खेळण्याची जागा आणि गेम परिसर पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर मॉलमधील सिनेमागृह, फूड कोर्ट, रेस्टॉरंट नागरिकांसाठी बंद असतील. मात्र फूड कोर्ट, रेस्टॉरंटमधील तयार पदार्थ घरपोच सेवा देता येणार आहेत. या नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेल, लॉज, अतिथीगृह पूर्ण बंद राहतील, तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय 33 टक्के क्षमतेने सुरु होतील. सर्व व्यावसायिकांनी दर्शनी भागात कोव्हिड सूचना फलक लावावेत. व्यावसायिकांनी हॉटेल पार्किंग आणि आवारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यात बुधवारपासून पंचतारांकित हॉटेल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३३ टक्के क्षमता, सोशल डिस्टन्सिंग, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता असे नियम हॉटेल मालकांना घालून देण्यात आले आहेत. बैठक व्यवस्था आणि रांगेत सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी खुणा कराव्यात, सोशल डिस्टन्स राखावे. रिसेप्शन टेबलच्या जागेभोवती काचेचे आवरण असावे. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग व्यवस्था करावी असे काही नियम आखून दिले आहेत.
ग्राहक हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर खोलीतील सर्व पडदे, चादर आणि इतर गोष्टी त्वरित बदलाव्यात. संबंधित रुम 24 तासांसाठी रिकामी ठेवावी. आवारातील स्वच्छतागृह, पिण्याचे पाण्याचे ठिकाण, हात धुण्याचे ठिकाण आणि इतर परिसरात निर्जंतुक करण्याची सूचना करण्यात आली. विश्रामगृहाच्या दरवाजाच्या कड्या, लिफ्टची बटणेची निर्जंतुकीकरण करावं. सर्व स्वच्छतागृहांची वेळोवेळी निर्जंतुक करावं. कर्मचारी आणि अतिथीनी वापरलेले मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावण्याची सूचना आहे.
गेल्या काही महिन्यांत लॉकडाउनचा फटका हॉटेल आणि मॉल व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा हॉटेल व मॉल सुरु झाल्यानंतर ग्राहक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.