पर्युषण पर्व: जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव

0
1165

जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व आज शनिवार (१५ ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. पुढील आठ दिवस जैन धर्मातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतील. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट- सप्टेंबर या काळात हे व्रत येते.

पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे) यांचा समावेश आहे.

पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचे शमन करणे. काम, क्रोध, लोभ, वैमनस्य या विकारांपासून दूर राहून स्वतःला शांती प्राप्त करून घेणे असे या व्रताचे महत्त्व जैन संप्रदायातील उपासकांसाठी सांगितले आहे. पर्युशमन असेही या व्रताला नाव दिले जाते, कारण यामध्ये मनातील विकारांचे शमन होणे अपेक्षित आहे.या व्रताच्या माध्यमातून साधकाने आध्यात्मिक प्रगती साधावी आणि शांतता प्राप्त करावी असा उद्देश असतो. या व्रताच्या काळात पाच नियमांचे पालन केले जाते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही पाच तत्वे पाळली जातात.

जैन धर्म अहिंसेवर आधारित आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत अनेक प्रकारचे कीटक आणि न दिसणारे सूक्ष्मजीव सर्वाधिक सक्रिय होतात, असे जैन संस्कारांत मानले जाते. या कालावाधीत मनुष्याच्या चालण्या-फिरण्याने या सूक्ष्मीजीवांना धोका पोहाचू शकतो, असा समज आहे. या जीवांना त्रास होऊ नये आणि जैन साधू-साध्वींकडून हिंसा होऊ नये, यासाठी या चातुर्मास काळात ते एकाच जागी मुक्काम करून धर्मसाधना, धर्म आराधना, संयम साधना आणि सर्वसामान्यांच्या आत्मकल्याणासाठी प्रेरणादायी प्रवचने देतात.

वर्षभर  जैन साधू-साध्वी देशभर अनवाणी चालून, धर्मजागरण आणि समाजप्रबोधनाचे काम करतात. चातुर्मास काळात जैन धर्मांचे प्रमुख संवत्सरी महापर्व म्हणजेच आठ दिवसांचे पर्युषण पर्व आधारणेसह साजरे केले जाते. वर्षभर जे जैन भाविक आपल्या रोजच्या जीवनात काही बाबींचे पालन करू शकत नाहीत, ते सर्व या आठ दिवसांच्या पर्युषण पर्वात पाळले जाते. रात्री भोजन न घेणे, ब्रह्मचर्याचे पालन, स्वाध्याय, जप-तप, मंगल प्रवचनांचा लाभ आणि साधू-संतांची सेवा याद्वारे जैन संस्कारांचे आचरण करीत जीवन फलदायी करण्याचा बांधव प्रयत्न करतात. चातुर्मासाच्या या चार महिन्यांच्या कालावधीत सर्व बांधवांना विशेषतः, युवक आणि महिलांना जैन साधू साध्वी जैन संस्कारांचे कथन करतात. त्यातून धर्म जागरण आणि समाजप्रबोधनही केले जाते.

भारताशिवाय इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी व इतर देशांतही पर्युषण पर्व आनंदाने साजरा केला जातो.