कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना शहरातील मान्यवरांच्या हस्ते केली जात असत.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या गणपतीची प्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते होणार?
कसबा गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते, तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते, तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गुरुजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना केसरीवाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते तर केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना आणि आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
गेल्या १२८ वर्षात प्रथमच असे घडणार असून याद्वारे मंडळातील आपापसातील स्नेहभाव आणखी वृद्धींगत होणार आहे. तसेच गणेश मंडळांनी सत्यविनायक पूजा देखील करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यंदा सर्व मंडळांनी भाविकांना ऑनलाइन गणरायाचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भाविकांनी या सेवाचा लाभ घ्यावा आणि रस्त्यावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.