गणपती बाप्पा मोरया: पुण्याचे ५ मानाचे गणपती

0
704

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण यंदा कोरोनामुळे गणपती उत्सव साध्या आणि शांततेत साजरा करण्यात येणार आहे. पुण्यात गणपती बाप्पाचे दर्शन करायचे म्हटले की सुरुवात होते मानाच्या गणपतीपासूनच. जाणून घेऊया या पाच मानाच्या गणपतींबद्दल…

पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती असे आहेत

  1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  2. तांबडी जोगेश्वरी गणपती
  3. गुरुजी तालीम गणपती
  4. तुळशीबाग गणपती
  5. केसरीवाडा गणपती

मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती

कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली.

मानाचा दुसरा गणपती – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते.

मानाचा तिसरा गणपती – श्री गुरुजी तालीम गणपती

गुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अशी गुरुजी तालीम गणपतीची ख्याती असून पूर्वी बुधवार पेठ मध्ये तालीम मध्ये बसवण्यात येत होता पण सध्या या गणपतीची स्थापना लक्ष्मी रस्त्यावर गणपती चौकात बसवण्यात येते. भिकू शिदे आणि उस्ताद नलबन या दोघांनी या गणपती मंडळाची सुरवात केली. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला म्हणूनच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्येचं प्रतिक मानला जातो.

मानाचा चौथा गणपती – श्री तुळशीबाग गणपती

श्री. तुळशीबाग गणपती मानाचा ४ था गणपती, याची स्थापना १९०१ साली करण्यात आली असून गणपतीसाठी जवळपास ८० किलोचे चांदीचे आभूषणे आहेत. फायबर ची मूर्ती बसवण्यासाठी सुद्धा या मंडळाची ख्याती आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.

मानाचा पाचवा गणपती – श्री केसरी गणपती

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली केसरी वाडा म्हणजेच गायकवाड वाडा इथे प्रथम गणपतीची स्थापना केली. छोटी पण सुबक मूर्ती अशी अशी या गणपतीची ख्याती असून गणपती मूर्तीमागे लोकमान्य टिळकांची मूर्ती आहे.केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते.