गणेशोत्सव विशेष : आरास गौराईची

0
982

लाडक्‍या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता महिलांनी गौराई पुजनाच्या तयारीला सुरूवात केली आहे. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.

गौराईची अनेक रूपं मनात सजलेली असतात. गौरी आवाहनाला गौरीचं घरोघरी होणारं आगमन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो. गौरीपूजनाच्या वेळी केली जाणारी गौरीची आरास, सजावट, भरला जाणारा ओवसा, गौरीचा नैवेद्य, खेळल्या जाणार्‍या फुगड्या व गाणी पाहता गौराईच्या स्वागताला सगळ्यांच्याच आनंदाचे भरते येते.

गौरी आली, सोन्याच्या पावली.
गौरी आली, चांदीच्या पावली.
गौरी आली, गाई वासराच्या पावली.
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली.
असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

काही ठिकाणी गौरीचे मुखवटे, तर काही ठिकाणी उभ्या स्वरूपात गौरी, तर काही बैठ्या स्वरूपात गौरीची आरास केलेली दिसून येते. यावेळी गौरीला दागदागिने, नवी साडी, मुकूट, नथ, केसांत फुलांची वेणी, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीच्या शेजारीच ही आरास केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या कथानकांचे देखावे सादर केले जातात. काही पौराणिक कथा, तर काही समाजजागृतीविषयक देखावे सादर केले जातात.

गणेशोत्सव काळातही गौराईच्या गीतांनी उत्साहाला उधाण येते. घरोघरी गौराईची सजावट, गौराईचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसते. गौरी घरी येते, तेव्हा तिच्या स्वागतासाठी लहान-थोर सरसावतात. महिलांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतो. उखाण्यांनी सजणारी गाणी, रंगणार्‍या फुगड्या असा एकच जल्लोष दिसून येतो.

ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.

परंपरेनुसार चालत आलेला रीतिरिवाज हा आजच्या नव्या पिढीसाठी नवखा असला तरी फुगडी, गीतांच्या मार्फत नव्या पिढीतील मुलींचा उत्साहही वाखणण्याजोगा ठरतो. गौराई घरी आल्यानंतर तिला सजवण्यासाठी, तिची आरास करण्यासाठी आजची पिढीही तितकीच उत्साहाने सहभागी होताना दिसते. फुगड्या खेळताना, फुगड्यांची गाणी गाताना नव्या पिढीतील मुलीही नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने घालून तितक्याच आनंदाने या सणाचा आनंद जपतात.

गौराई जागवल्यानंतर उखाणी, झिम्मा-फुगड्या असे खेळ खेळल्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी गौराईला दही-भाताचा नैवेद्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विहीर, तळे, नदी, समुद्र आदी पाण्याच्या ठिकाणी गौराईचे विसर्जन केले जाते. गौरी विसर्जनाच्या दिवशी काही ठिकाणी गणेशविसर्जनही केले जाते. गौरी-गणपती उत्सवाच्या निमित्ताने जागला जाणारा उत्साह परंपरा, रीतिरिवाजाचा एक स्रोेत जपणारा ठरला आहे.