श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती

0
1105

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा पुण्यातील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या बाप्पाची ही मूर्ती अतिशय वेगळी असून लाकूड आणि भुसा वापरून तयार केली गेली आहे. १२९ वर्षांपासून मंडळ इको फ्रेंडली गणपतीची स्थापन करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते. हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती म्हणून या मूर्तींची ओळख आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती इतिहास

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे पूर्ण नाव. भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. यावरूनच त्यांचे रंगारी हे नाव रूढ झाले. भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटीश साम्राज्याविरोधात कारवायांसंदर्भात विचार सुरू होता. यातूनच गणेशोत्सवाचा विचार पक्का झाला. त्यांनी आपल्या वाड्यात साथीदारांसोबत बैठक बोलवली आणि पुण्यात तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वातंत्र्याच्या विचारांपासून सर्वसामान्य माणूस दुर जात आहे हि बाब रंगारींना अस्वस्थ करत होती. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपला जाती, धर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे अशी समाजाला दिशा देणारी विचार धारणा भाऊसाहेबांची होती. त्यांचे स्नेही सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्याशी झालेल्या चर्चेमधून रंगारी आणि खासगीवाले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना पुढे आली. रंगारींनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांच्या बैठकीत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खांडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्तींना बोलावले. या बैठकीत रंगारी यांचे नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा बेत आखला गेला. १८९२ मध्ये रंगारींच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण तीन गणपती बसवण्यात आले – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती, आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती या तीन गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुदर्शीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. या सार्वजनिक मिरवणुकीत काशिनाथ ठाकूजी जाधव यांचा सवाद्य मेळाही होता. उत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील जाती पंथामध्ये अडकलेला समाज या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात झाली. पुढे या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढत गेले. भाऊसाहेब रंगारी गणपतीपुढे पुढाऱ्यांची, समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची भाषणे झाली. लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, बिपिनचंद्र पाल, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, राजगुरू अशा अनेकांनी भाषणे आणि भेटी देऊन गणेशोत्सवाला प्रोत्साहन देऊन देशकार्यासाठीचे बीज रोवले.

मिलिंद ऊर्फ बाबा डफळ यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची नवी पिढी म्हणून कार्यरत आहे. गरीब मुलांना शालेय साहित्य मदत, एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, आरोग्य शिबीर, दर महिन्याच्या नऊ तारखेला आयुर्वेद उपचार शिबीर असे अनेक सामाजिक उपक्रम मंडळाकडून नियमितपणे राबविण्यात येतात. गणेश जन्म उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे आजच्या काळातील इतरांच्या दणदणाटी आणि झगमगत्या उत्सवाच्या तुलनेने भाऊ रंगारी गणेशोत्सव धार्मिक व पारंपरिक पद्धतीने करण्यात येतो.

ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० साली गणेशउत्सवावर काही मर्यादा आल्या, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मार्फत पहिल्यांदाच ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले, या पहिल्या ऑनलाईन उत्सवाची संकल्पना ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी प्रत्यक्षात आणली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली त्याऐवजी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तर्फे ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली.