काय आहे “अप्पा बळवंत चौक” या नावामागील इतिहास

0
971

पुणे तिथे काय उणे ही म्हण सर्वत्र ऐकायला मिळते. पुणेचा इतिहास जुना त्यामुळेच पुणेला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. अशीच पुण्यातील एक महत्वाचे आणि नेहमी गर्दी असणारे ठिकाण म्हणजे अप्पा बळवंत चौक. काय आहे या अप्पा बळवंत चौकाची कहाणी आणि त्या नावामागील इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत.

पुण्याला शिकायला आलाय आणि त्याला अप्पा बळवंत चौक माहित नाही असं कधी होत नाही. आपल्या गावाकडं शाळेची वह्या पुस्तक घ्यायचं म्हटल्यावर एक दुकानं असत. पण या विद्येच्या माहेरघरी वह्या पुस्तकांचं एक छोट गावचं वसलंय. त्याला अप्पा बळवंत चौक म्हणतात. हां आजकालच्या बाहेरून आलेल्या निर्वासित पुणेकरांनी त्याच नाव एबीसी असं काहीतरी केलाय.

अप्पा बळवंत चौक पार्श्वभूमी :-

तर हे अप्पा बळवंत म्हणजेच ‘कृष्णाजी बळवंत मेहेंदळे’ . त्यांचे वडील बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे एक प्रमुख सेनापती होते . अत्यंत कुशल लढवय्ये असणाऱ्या बळवंतरावांनी त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम गाजविला होता . पण दुर्दैवाने ते १७६० मध्ये पानिपत रणसंग्रामात मरण पावले. अब्दालीने त्यांचे शिर सदाशिवभाऊंना भेट म्हणून पाठवले होते . त्यांची पत्नीही तिथे सती गेल्या. तेव्हा या अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन कृष्णाजी उर्फ अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी घेतली .

एके दिवशी सवाई माधवराव पेशवे पर्वतीहून शनिवारवाड्याकडे हत्तीवरून परतत होते . त्यांच्याबरोबर त्यावेळेस अंबारीत अप्पा बळवंत हे देखील होते . त्यावेळेस येताना पेशवे यांना भोवळ आली . आणि सवाई माधवराव पेशवे खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पा बळवंतांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना सावरले , या अपघातातून वाचविले . पेशवे खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता . आपल्यावरील संकट टळले म्हणून हा प्रसंग जेथे घडला , ती जागा अप्पा बळवंतांच्या नावाने ओळखली जाईल , असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले . तर ही आहे या चौकाच्या नावामागची आख्यायिका . १७९८ मध्ये अप्पा बळवंतांचे निधन झाले .

पुढे याच चौकात म्हणजे आत्ताच्या किबे लक्ष्मी थिएटर समोर सरदार बळवंत मेहेंदळ्यांनी इ.स. १७६१ च्या आधी ३ मजली ४ चौकी असा भव्य वाडा उभारला होता असे कळते . या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते. काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहेंदळ्यांकडे येत . भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना याच वाड्यात आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३२ म्हणजे ७ जुलै १९१० रोजी झाली . याप्रसंगी सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे दोघेच उपस्थित होते . काळाच्या ओघात येथे रस्ता रुंदीकरणात त्यांच्या वाड्याचा जवळपास सगळाच भाग त्यात गेला . परंतु आज अप्पा बळवंत हे नाव मात्र चौकाच्या निमित्ताने राहिले आहे .

शिक्षण विषयक पुस्तकांच्या आणि साहित्याच्या खरेदीसाठी बाहेरगावाहून अप्पा बळवंत चौकात येणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. एका बाजूला हाकेच्या अंतरावर प्रसिद्ध नूतन मराठी विद्यालय, दुसरीकडे ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीचे मंदिर आणि शेजारीच ऐतिहासिक प्रभात (किबे लक्ष्मी थिएटर) चित्रपटगृह असा संपन्न परिसर या चौकाला लाभला आहे. असा एकही शिक्षण विषय नाही, ज्याचा अप्पा बळवंत चौकाशी संबंध नाही. इंजिनीअरिंग व मेडिकलची ‘क्रेज’ वाढली, तेव्हा त्या विषयांची सर्व पुस्तके केवळ इथेच मिळायची. नंतर संगणक विषयक अभ्यासक्रम, व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम आणि आता सीए या लोकप्रिय अभ्यासक्रमांची पुस्तके येथेच मिळतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अप्पा बळवंत चौक हे दुसरे घर आहे, असे म्हटले तर अतिशोयक्ती होणार नाही. मराठी साहित्य व्यवहाराची ही पहिली बाजारपेठ. पुस्तकांची दुकाने बंद होण्याच्या काळात या चौकातील दुकाने मात्र आजही घट्ट पाय रोवून उभी आहेत. पुस्तकांची बाजारपेठ ही अप्पा बळवंत चौकाची ख्याती अगदी जगभर पसरली आहे. विद्यार्थी वरच्या इयत्तेत गेल्यानंतर त्याच्याकडून पुस्तके खरेदी करायची आणि पुढील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात विकायची, अशी जुन्या पुस्तकांची आगळी बाजारपेठही याच चौकातली!