गावातील निसर्ग हाच तर खरा खजिना

0
3482

पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. जगातील काही देशांची तर बहुतांशी अर्थव्यवस्थाच तेथील पर्यटनावर अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील पर्यटनही गेल्या दशकभरात २५ त ३० टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पर्यटन वाढीचे मुख्य कारण आहे त्या त्या देशातील निसर्ग संपन्न प्रदेश, वैभवशाली इतिहास आणि स्थानिक संस्कृती! तस बघायला गेलं तर उंचसखल डोंगरदऱ्या, समृद्ध जंगले, शांतरम्य समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता, जीवनदायिनी नद्या, फेसाळ धबधबे, वाळूची पुळण व खाड्या, कांदळवने, छोटी मोठी बेटे, गवतांचे गालिचे पसरलेली पठारे, पाण्याचे तलाव, अंधाऱ्या गुहा आणि पूर्वापार देवराया म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच!

यंदा कोरोनामुळे पर्यटनाला आळा बसलेला आहे. मात्र ग्रामीण भागात गावोगावी पावसाळ्यामध्ये निसर्ग चांगलाच बहरला आहे. मी माझ्या वाडा गावात आलो आहे. वाडा गाव हे खेड तालुक्यात भीमाशंकर जवळ वसलेलं आहे. तुम्ही कधीही येथे आलात तर आजूबाजूचा निसर्गमय आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून नक्कीच त्याच्या प्रेमात पडाल असा आहे. वाड्यावरून तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर भीमा नदी आणि आजूबाजूची डोंगर आणि तेथील झाडे तुमच्यासोबत प्रवास करत आहे असा भास तुम्हाला होत राहील.

हिरव्यागार डोंगर रांगा, त्यातून वाहणारे धबधबे, डोंगरमाथ्यावर जमा होणारी धुक्याची चादर हा निसर्गाचा नजराणा येथे तुम्हाला पाहायला मिळतो. कितीही शहरात राहिले तरी गावात येऊन तेथील निसर्गाचा अनुभव आपल्याला नेहमी चांगली ऊर्जा आणि काहीतरी नवीन शिकवण देण्याचे काम करत असतो. तुम्ही राजगुरूनगर पासून पुढे २८ किमीवर वाडा या गावी आला तर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत आल्यासारखे वाटेल.

आजकालची तरुण पिढी नोकरीसाठी शहरात जातात आणि पैसे कमविण्यासाठी निराशाजनक आयुष्य जगत असतात. अशावेळी थोडा वेळ काढून एकदातरी आपल्या गावी नक्की जात जा ज्यामुळे तुम्ही तेथून पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन परत येताल. मी स्वतः शहरात राहतो पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वाडा या माझ्या गावी जाऊन तेथील निर्सगाच्या सानिध्यात मी स्वतःला सामावून टाकतो.

नेहमी मनात येत असते गड्या कितीही शहरात पैसे कमव पण खरा खजिना तर आपलं गाव आहे आणि तेथील मन समृद्ध करणारा निसर्ग आहे. तर विचार कशाचा करताय नक्की एकदा तरी ग्रामीण भागात आपल्या गावाला भेट द्या आणि मस्त आयुष्य जगा.

 

निसर्गामुळे खुलूनी जातो ग्रामीण भाग,

गड्या नको विचार करू चल माझ्या मागं…!!

आजूबाजूला हिरवाईने निसर्ग सजला छान

गावी जाऊन भटकंती करत फिरुया सारं रान…!!!