भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं.
दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु असताना पुन्हा एकदा झडप झाल्याचं समोर आले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यानंतर भारतीय सैन्य पुन्हा अलर्टवर आहे. चीन एकीकडे शांततेचा नाटक करत आहे आणि दुसरीकडे सैन्य घुसखोरी करत आहे. चीनी सैनिकांच्या घुसखोरीला यावेळी भारतीय सैन्याने जोरदार उत्तर दिलं.
भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगोंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक 29-30 ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं.
दरम्यान, पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. भारतीय लष्कर शांतता राखण्यावर विश्वास ठेवतं, पण आपल्या सीमेचं रक्षण करण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय लष्कराने दिली आहे. झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या पत्रकानुसार, भारतीय सैन्याने चीनला घुसखोरी करु दिलेली नाही. भारताने या परिसरातील सुरक्षा आणखी वाढवली आहे. झटापटीनंतरही चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावरील फ्लॅग मीटिंग सुरु आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवरील ही दुसरी मोठी घटना आहे