पोलीस विभागात आरोपीची विचारपूस करताना त्याच्या बोलण्यातील सत्यता तपासणे कठीण असते. मात्र, विज्ञानाच्या आधारावर काही प्रमाणात का होईना, ते शक्य झाले आहे. संबंधित वैज्ञानिक तपासणी प्रक्रियेला नार्को टेस्ट असे म्हटले जाते. कधी-कधी पोलिसांना गुन्हेगारांसमोर हाथ देखील जोडावे लागतात. मग अशावेळी पोलिसांना या लोकांकडून खरे जाणून घेण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करणे भाग पडते. अनेकदा तुम्ही नार्को टेस्ट बद्दल ऐकलं असेल पण नेमकं नार्को टेस्ट म्हणजे काय? हे आपल्याला फारसं माहिती नसतं म्हणून नेमका हा प्रकार काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नार्को टेस्ट म्हणजे काय?
नार्को टेस्ट ही अशी चाचणी असते, जी आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते. या चाचणीत आरोपीस काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जाते. त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करुन उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होते. त्या अवस्थेत गुन्हेगार साक्ष देताना,उत्तरे देताना सहजा-सहजी फसवणूक करु शकत नाही.
कशी करतात नार्को टेस्ट?
खोटं बोलताना आपण कल्पनांचा आधार घेतो, पण ही टेस्ट करत असताना आरोपीला अर्ध बेशुद्ध अवस्थेत आणले जाते.
यासाठी आरोपीला “ट्रुथ ड्रग” नावाचे मनोवैज्ञानिक औषध किंवा सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन आरोपीचे वय, लिंग, आरोग्य आणि शारीरिक स्थिती यांच्या आधारावर देण्यात येते.
नार्को टेस्टमध्ये प्रश्नांची उत्तरे देत असताना तो व्यक्ती पूर्णपणे शुद्धीत नसतो, त्यामुळे तो प्रश्नांची खरी उत्तरे देतो, कारण त्यावेळी तो व्यक्ती उत्तरांना उलट-सुलट फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये नसतो.
तो व्यक्ती एकप्रकारच्या संमोहन अवस्थेमध्ये गेलेला असतो, तो त्याच्या बाजूने जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो, फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देऊ शकतो.
या परिस्थितीमध्ये व्यक्तीला खोटे बोलणे सहसा शक्य नसते, तरीसुद्धा काही लोक या अवस्थेमध्ये देखील खोटे बोलून विशेषतज्ञांना चुकीची माहिती देतात. पण अशा गोष्ट अपवादात्मक आढळतात.
नार्को टेस्ट करण्यापूर्वी घेण्यात येणारी काळजी
१) कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याची शारीरिक तपासणी केली जाते. आरोपी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा शारीरक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यास ही चाचणी केली जात नाही. २) नार्को टेस्टची औषधे आरोपीचे आरोग्य, वय आणि लिंगाच्या आधारे दिली जातात. बर्याच वेळा औषधाच्या जादा डोसमुळे ही चाचणी अपयशी ठरते, म्हणून ही चाचणीपूर्वी बरीच काळजी घ्यावी लागते.
३) बर्याच प्रकरणांमध्ये या चाचणीदरम्यान औषधाच्या जादा डोसमुळे आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ही चाचणी बऱ्याच विचारपूर्वक केली जाते.