‘शिक्षक दिन’ विशेष : काय आहे शिक्षक दिन साजरा करण्यामागची गोष्ट

0
541

आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे.. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात ५ ऑक्टोबरला साजरा केला जाणारा शिक्षक दिन आपल्याकडे ५ सप्टेंबरलाच साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. शिवाय त्यांचीही तशी इच्छा होती.

जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे असते. शिक्षक हे राष्ट्राचे भविष्य आणि युवा वर्ग यांच्या जीवनाचा विकास करण्यासाठी, त्यांना आकार देण्यासाठी खूप खूप महत्वपूर्ण भूमिका साकारत असतात. प्राचीन काळापासून ऋषी, गुरु यांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव आहे. यशाजवळ पोहोचण्यासाठी गुरु, शिक्षक यांचं मार्गदर्शन आवश्यक असतेच.असं म्हटल्या जातं की गुरु अर्थात शिक्षकाशिवाय योग्य मार्गावर चालल्या जाऊ शकत नाही कारण ते आपल्याला ओळखून योग्य मार्गदर्शन करत असतात.  म्हणूनच तर असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही की जन्मदात्यापेक्षा किंचित जास्त महत्व हे गुरु, शिक्षक यांना दिल्या जाते. कारण ज्ञान हेच माणसाला माणूस बनवते, जगण्याचा योग्य मार्ग दाखवते.

शिक्षक दिन का साजरा केला जातो?

दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म- दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात पहिला शिक्षक दिन १९६२ मध्ये साजरा केला गेला. कारण याच दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर भारताचे राष्ट्रपतीपद भुषविले. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे स्थान कायम होते. त्यामुळे त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला. ते ब्राम्हण कुळातले असल्याने घरात धार्मिक वातावरण होते. अवघ्या १५ व्या वर्षी मॅट्रिक पास करत त्यांनी तत्वज्ञान या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी ‘वेदांतातील नीतिशास्त्र’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला.

एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या कार्यातून स्वतःची साऱ्या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व यामुळे साता समुद्रापारही त्यांची कीर्ती झाली. शिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठातही डॉ. राधाकृष्णन नीतिशास्त्राचे प्राध्यापक होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या उपाधींनी गौरविण्यात आले. ते काही काळ बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. या काळात त्यांनी विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले.

डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षकी जीवनबरोबरच राजकारणातही आपली छाप पाडली. १३ मे १९५२ रोजी ते देशाचे पहिले उपराष्ट्रपती बनले. व १३ मे १९६२ मध्ये दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांचा जन्मदिन हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा केला जावा, अशी इच्छा त्यांनी जवाहरलाल नेहरूंकडे बोलून दाखवली. त्यांनीही ती तात्काळ मान्य करत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याचा शासन आदेश काढला. शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे डॉ. राधाकृष्णन म्हणत असे.

जीवनात शिक्षकांचे महत्त्व

शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

नाही पाहिजे डिजिटल युग,नाही पाहिजे ३G आणि ४G
मला हवीय माझी शाळा आणि हवेय फक्त माझे गुरुG

सर्व थोरांना आणि मोठ्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा…!!