निसर्ग चक्रीवादळ: तो भयानक दिवस आणि ३ महिन्यानंतरची परिस्थिती

0
4162

निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकणाला सर्वाधिक बसला होता, आता या घटनेला तीन महिने उलटले तरी मात्र त्याच्या कटू आठवणी अजूनही कोकणवासीयांच्या मनात घर करून बसल्या आहेत. कोकणातील केळशी येथील अमित कोठारी यांनी त्या दिवसाचा घटनाक्रम आणि ३ महिन्यानंतरची परिस्थितीचे वर्णन केले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल काही घडामोडी.

आदल्या दिवशी दापोलीतून तहसीलदार,प्रांत अधकारी ग्रामपंचायत मधे येऊन 3 व 4 तारखेच्या होणाऱ्या वादळाची माहिती देत सावध करून 2 दिवस कडकडीत कर्फ्यु असल्याचे सांगितले. वादळ यापूर्वी कधी पाहिला नसल्यामुळे सगळ्यांनीच याकडे दुर्लक्ष केले. मला तर मित्रांचे ,काही नातेवाईकांचे फोन आले की काळजी घ्या, वगरे वगरे. प्रत्येकाला मी अगदी अभिमानाने सांगत होतो “आमच्या गावाला एका बाजूला समुद्र आणि बाकी तिन्ही बाजूला डोंगर आहे, वादळ वगरे काही नाही होत इकडे, असे किती आले नी किती वादळ गेले पण केळशी ला टच सुद्धा नाही केले , केळशी गावावर श्री महालक्ष्मी चे आणि याकुब बाबा चे लक्ष आहे… काही नाही होणार”.

तारीख ३ जूनला कर्फ्यु असल्यामुळे दुकानात जायचे नव्हते म्हणून मस्त चहा बिस्कीट खाऊन सगळे धर्मध्यान करायला बसलो, एक तासभर झाल्यावर साडे नऊ वाजता बाहेर येऊन पाहतो तर वाडीत रामफळ आणि जायफळ हे दोन्ही झाडे पडलेली दिसली. खूप वाईट वाटले कारण 22 वर्षानंतर जायफळ च्या झाडाला यंदा भरपूर जायफळ आले होती. कापा फणसाचे झाड हलत डुलत होते. ते पाहत असताना अचानक बाजूच्या घरावर पत्र्याची शेड पडलेली पाहून प्रचंड घाबरलो आणि सगळे घराच्या मधल्या हॉल (माजघर) मधे येऊन बसलो. हॉल चे चारही दरवाजे बंद केले, बाहेरून नुसता जोर जोरात पत्र्यांचा आवाज आणि मुसळधार पाऊस सगळेच घाबरून गेलो.सगळ्यांनी पुन्हा देवाचे नामस्मरण चालू केले. जिथे बसलो तिथेही वरून पाणी यायला लागले कारण वरती वाऱ्यामुळे कौले सरकली होती, काही कौल आत पडत होती. आजूबाजूचे शेजारी घाबरल्यामुळे त्यांना आम्ही बसलेलो तिथे आणले.

हे 2 तास टेंशन मधे असेच चालू होते मग आवाज कमी झाल्यावर दरवाजा उघडून बाहेर आलो तर पाहतो तर सगळं होत्याच नव्हत झालं होत. वाडीत सगळी झाडे मुळासकट उपटून, एकही झाड शिल्लक राहिले नव्हते. घराची पूर्ण पाइपलाइन उध्वस्त होऊन टाकी खाली पडली होती.. सहज दुकानाकडे चक्कर मारायला गेलो तर जवळपास 90 टक्के घरांची पत्रे उडाली होती. न भरून येणारे नुकसान सगळ्यांचे झाले होते. रस्ते तर लाईट चे पोल आणि झाडे पडून वायरिंनी आणि फांद्यानी पॅक झाले होते. 3 वाजल्यानंतर सगळे बाहेर पडून आपापले पत्रे गोळा करत होते तर काही घरातल्या चिखलाची साफसफाई. मी बाजारपेठेत राहत असल्यामुळे गावात कुठे कुठे काय काय झाले आहे, कुठे जीवित हानी नाही ना या काळजी ने बाहेर निघालो तर पाहतोय तर लोक कोयत्या ,कुऱ्हाडी घेऊन मार्ग काढत येत होती.3 दिवस केळशी गाव कोणाच्याही संपर्कात नव्हते. सगळ्याच दुकानात ताडपत्री, पत्रे ,मेणबत्ती, सेलवाली बॅटरी यासाठी झुंबड होती. कित्येक जणांचे आगोट चे भरलेले समान (पावसाळ्यापूर्वी खरेदी केलेले किराणा सामान) भिजून नष्ट झाले होते. श्री महालक्ष्मी ची कृपाच होती म्हणून इतके मोठे निसर्ग वादळ येऊनही जीवित हानी अजिबात झालेली नव्हती.
प्रत्येक जण स्वतःचे घराचे काम आटपून इतरांना जमेल तशी मदत करत होते. इतकं मोठं संकट येऊनही तरुण वर्गासोबत वृद्ध लोकही आपापले काम हसत खेळत करत होते, मनात टेंशन असेलही पण आलेल्या संकटाला हसत सामोरे जाण्याची ताकद – शक्ती ही कोकणातील माणसाला जन्मतःच मिळालेली आहे.

तीन महिन्यानंतर ही आहे परिस्थिती :-

निसर्ग चक्रीवादळ ला आज 3 महिने पूर्ण झाल्यावरही गावातील लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. आज गावात संपर्कासाठी कोणतेच नेटवर्क नाहीये. साधारण अडीच महिन्यांनंतर बीएसएनएल(BSNL) ने एक्सचेंज वरून काही किलोमीटर पुरती सेवा चालू करून दिली मात्र तीही अपुरी असल्यामुळे इंटरनेट ला वेग मिळत नाही. कालच घोषणा करण्यात आली की अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे पण इंटरनेट सुविधा नसल्यामुळे कसा अभ्यास करणार?? कशी परीक्षा घरी बसून तरी देणार?? आज MTDC ने कोकणातील पर्यटन व्यवसाय चालू व्हावा म्हणून हॉटेल, लॉज चालू केल्याचे सांगितले मात्र नेटवर्क अभावी वादळग्रस्त भागात कश्या बुकिंग येतील ही मोठी चिंता पर्यटन व्यावसायिकांमध्ये आहे. म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिने तसे झाले लाईट बिल या आठवड्यात वाटली गेली,बिलाचे आकडे पाहताच सगळे अा वाचून बघत राहिले. तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, रेशन दुकान यांना इंटरनेट सेवा आवश्यकच आहे. मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प असल्याने गावात बँक,पोस्ट ऑफिस यातील व्यवहार होण्यास अजूनही अनेक अडचणी येत आहेत.

22 मार्चपासून कोरोनाचे संकट आणि 3 जून वादळाचे संकट अश्या मोठ्या संकटाला सामोरं जात असताना सरकारकडून कोकणातील माणसाला मोबाईल,इंटरनेट सोबतच मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे.

नक्कीच प्रशासन आणि तेथील सरकारी कर्मचारी हे वाचून तरी तेथील परिस्थिबद्दल गांभीर्याने लक्ष देतील आणि कोकण पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढे येईल हीच सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो.

( केळशी येथील अमित कोठारी यांनी ह्या आठवणी सांगितल्या आहेत)