साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. निरक्षर असलेल्या लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात ‘जागतिक साक्षरता दिन’ साजरा केला जाऊ लागला.
साक्षरता दिन महत्त्व
मानवी समाजाचा विकास होऊन तो अधिकाधिक सुसंस्कृत बनावा. समजात शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांकडून अज्ञानी लोकांची होणारी फसवणूक, पिळवणूक, शोषण आदींपासून त्यांची मुक्तता व्हावी. यासाठी जगभराती देश प्रयत्नरत आहेत. म्हणूनच युनेस्कोनेही यावर विचार करुन आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याचे ठरवले. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. जगभरातील जन्मदर कमी करुन लोकसंख्येला आळा घालणे, लैंगिक समानता, व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा उंचवावणे या गोष्टीही साक्षरतेशी निगडीत आहेत. म्हणूनच आजही आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे प्रचंड महत्त्व आहे.
ज्यावेगाने व ज्याप्रकारे माहिती तंत्रज्ञानात रोज काही ना काही भर पडत आहे व त्याची मांडणी होत आहे त्यावरून खरोखरच आपण निरक्षर आहोत की काय असे वाटू लागते. हा न्यूनगंड आपल्याला अस्वस्थ करणारा ठरत आहे. 21व्या शतकातील या माहितीयुगात साक्षरतेचे निकष हळू हळू बदलत आहेत व याची जाणीव होण्यास आपल्याला वेळ लागत आहे. मागील शतकापर्यंत मुद्रित वा लिखित मजकूर वाचूनच (वा काही वेळा रेडिओच्या माध्यमातून) आपल्या ज्ञानात भर पडत होती. माहितीची देवाण घेवाण होत होती. आज मात्र कित्येक पुस्तकं, कथा, कादंबर्या, नियतकालिकं, अंकीकरणाच्या (डिजिटाइज्ड) स्वरूपात उपलब्ध होत असल्यामुळे संगणक/ मोबाइल / टीव्हीच्या पडद्यावरून वाचत, श्राव्य स्वरूपातून ऐकत, वा दृक्-श्राव्य स्वरूपातून बघता बघता ऐकतसुद्धा आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो, संवाद साधू शकतो. संवाद हा केवळ अक्षरं वा शब्दं यांची जुळणी करून कागद वा श्राव्य माध्यमातून व्यक्त करण्याची प्रक्रिया हा समज कालबाह्य ठरत आहे. यानंतरची संवाद प्रक्रिया, माहितीचे देवाण-घेवाण, ज्ञान व मनोरंजन डिजिटल स्वरूपात येत असून या डिजिटल स्वरूपाची व त्या त्या तंत्रज्ञानाची तोंड ओळख असणे, त्याचे जुजबी ज्ञान असणे यालाच आता साक्षरता म्हणावे लागणार आहे.
निरक्षरता हा मानवाच्या जीवनातील सर्वांत मोठा अभिशाप आहे. साक्षरता म्हणजे फक्त वाचन-लेखन करता येणे किंवा पदवी संपादन करणे नव्हे. तर लोकांचे हक्क, अधिकार, कर्तव्यांची जाणीव, कौशल्य विकास, समाजात विकासाकरिता योगदान देण्याची भावना निर्माण करणे म्हणजे साक्षरता होय. महिला व पुरुषांमध्ये समानता आणण्यात साक्षरतेचे महत्त्वाचे योगदान आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी साक्षरता एक मुख्य आधारशिला आहे. गेल्या काही काळात भारतातही साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. परंतु, ते समाधानकारक मात्र नाही. साक्षरतेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी व नागरिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण तसेच शहरी भागांत वेगवेगळ्या योजना राबविल्या. सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, माध्यान्ह भोजन योजना, प्रौढ शिक्षा योजना, राजीव गांधी साक्षरता मिशन याारख्या योजनांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तीपर्यंत शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे.
देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या साक्षरतेच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, १९५० मध्ये देशात शिक्षणाचे प्रमाण १८ टक्के होते. १९९१ मध्ये साक्षरतेचे हे प्रमाण ५२ टक्क्यांवर तर २०११ मध्ये ते ७५.०६ टक्क्यांवर पोहोचले. पण शंभर टक्के साक्षर होण्यास अजून भरपूर वेळ आहे. केरळसारखे राज्य वगळता इतर राज्यांमधील स्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. बिहार, उत्तरप्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे नि:शुल्क शिक्षण दिले जाते. तरीसुद्धा तिथे साक्षरतेचे प्रमाण कमीच आहे. यासाठी राजकीय नेते व प्रशासकीय अधिकार्यांची उदासीनता, शासन व जनतेतील सामंजस्याचा अभाव, शासकीय शाळांची दुरवस्था, चांगल्या व कर्तृत्ववान शिक्षकांची कमतरता, निधीची अनुपलब्धता इत्यादी बाबी कारणीभूत असू शकतात. त्या कारणांचा गांभीर्याने विचार करून शिक्षणानुकूल वातावरण निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण हे मानवी प्रगतीचे शास्त्र आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती साक्षर झाली तरच देश प्रगती करू शकेल.
आपला देश साक्षर व्हावा असे वाटत असेल, तर प्रत्येक सुशिक्षित नागरिकाला या यज्ञकुंडात योगदान द्यावे लागेल.आपल्या अशिक्षित देशबांधवांना साक्षर करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
जिथे निरक्षरता ,तेथे ज्ञानज्योतीचा दीप लावूया
आपल्या देशाला साक्षरतेच्या प्रकाशाने उजळून टाकूया…!!