रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला

0
219

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांना तुरुंगातच रहावं लागणार आहे. एनसीबीने अटक केल्यानंतर न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तिला आणि शौविकला जामीन मिळावा यासाठी कायदेशीर प्रयत्नही करण्यात आले.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रिया आणि इतरांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय सत्र न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ती आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी मंगळवारी न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.