Engineers Day Special: अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनिअर्स डे’ का साजरा केला जातो?

0
1044

भारतामध्ये इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणून काम करणार्‍यांसाठी 15 सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. देशात भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्मदिवस म्हणून हा अभियंता दिवस म्हणून साजरा करतात. भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्‍वरय्या केवळ अभियंता नव्हते तर कट्टर व थोर देशभक्तही होते.

इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था आहे पण ती इंजिनिअरांचे नियंत्रण करीत नाही. डॉक्टर, सीए, सीडब्लूए यांची व्यावसायिक नीतिमत्तेची नियमावली असते. तशी इंजिनिअरांची नसते.

इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. डॉक्टरांना दुसर्‍या वर्षापासून प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये रुग्ण तपासणी वगैरे करावी लागते. सीएंना ३ वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. शिवाय डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशिप केल्यावरच प्रॅक्टिस करता येते. सीएंना पास झाल्यावर ३-४ वर्षे दुसर्‍या सीएच्या हाताखाली काम केल्यावरच सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळते. वकीलालाही असेच काहीसे असते. हा झाला इंजिनिअरिंग आणि बाकी क्षेत्रामधील फरक. आता आपण जाणून घेऊया इंजिनियर्स डे साजरा करण्यामागील नक्की काय कारण आहे.

“इंजिनियर्स डे आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्याबद्दल आढावा:

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी या अतिदुर्गम खेड्यात 1861 साली 15 सप्टेंबरला या श्रेष्ठ अभियंत्याचा जन्म झाला. अत्यंत कठीण असलेली इंजिनिअरिंगची अंतिम परीक्षा त्यांनी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली व या देशातील पहिले अभियंता (इंजिनिअर) बनण्याचा बहुमान मिळवला. वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचे निधन झालेले. घरात आठराविश्व दारिद्य्र. शिक्षणास पैसा नाही. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ आईच्या उत्तम संस्काराने स्वतःच्या विद्वत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून बंगळूर येथे प्रारंभीचे शिक्षण विश्वेश्‍वरय्या यांनी पूर्ण केले.

वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्यांच्या बुद्धिमत्तेतील स्थापत्य विषयातील नैपुण्य लक्षात घेऊन त्यांना तत्कालिन मुंबई इलाख्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्याचबरोबर 1904 साली त्यांना बढती मिळून संपूर्ण देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान मिळाला. त्यावेळेपर्यंत या पदावर इंग्रज लोकच अभियंता म्हणून काम करत होते. विश्वेश्‍वरय्या यांना बहुमान मिळाल्याने त्यांचे संपूर्ण देशातून कौतुक झाले.

आपल्या नोकरीच्या कार्यकाळात विश्वेश्‍वरय्या यांनी ठिकठिकाणी 24 वर्षे नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्याकाळात त्यांनी कृष्णराज सागर हे कावेरी नदीवरील धरणाचे काम पूर्ण केले. त्यांना या कामाचे पारितोषिक म्हणून गौरवार्थ म्हैसूर संस्थानचे दिवानपद त्यांना बहाल करण्यात आले.

डॉ. विश्वेश्वरय्या यांनी कर्नाटक राज्यात आधुनिकतेचा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात तर सिंहाचा वाटा उचलला होता. भारत पारतंत्र्यात असताना त्यांनी तिथे कृष्णासागर बांध, भद्रावती स्टील वर्क, मैसूर तेल आणि साबण कंपनी या बड्या कंपन्यांची स्थापना केली.

बँक ऑफ मैसूर सारख्या प्रथितयश बँकेची उभारणी त्यांच्याच प्रयत्नातून शक्य झाली. या योगदानासाठी त्यांना “कर्नाटकचे भगीरथ” ही पदवीही मिळाली आहे.

डॉक्टर विश्वेश्वरय्या अवघ्या तिशीच्या वयात असताना त्यांनी दुष्काळात असल्याला कुक्कुर भागाला सिंधू नदीचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली. ही योजना सरकारी अभियंत्यांच्या डोळ्यातून सुटली नाही. सरकारने सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी एक समिती बनवली व त्या समितीत विश्वेश्वरय्या यांना स्थान दिले. हे काम करत असताना त्यांनी धरणाच्या एका नव्या तंत्रज्ञानाचा शोध लावला.

*त्यांनी धरणाचे पाणी अडवण्यासाठी स्टीलचे दरवाजे बनवले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांच्या या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आजही हे तंत्रज्ञान जगभरात धरण बांधकामात वापरले जात आहे.*

याव्यतिरिक्तही भारतभरात अनेक ठिकाणी धरण बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीत डॉ. विश्वेश्वरय्या यांनी मोलाचे योगदान दिले. सुदृढ शरीरयष्टी आणि आरोग्याच्या जोरावर विश्वेश्वरय्या शंभरीपेक्षा जास्त काळ जगले.. आणि जाताना भारतातील अभियांत्रिकीच्या क्षेत्रात कधीच पुसला न जाणारा ठसा सोडून गेले. म्हणूनच १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात *“इंजिनियर्स डे”* म्हणून साजरा केला जातो.